कुंभमेळा महिला आखाड्यांना समान दर्जा द्या
शंकराचार्य त्रिकाल भवंता यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात पुरुष साधू-महंतांच्या आखाड्यांप्रमाणेच महिला साध्वी आखाड्यांनाही समान धार्मिक दर्जा, सन्मान आणि सोयीसुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी प्रयागराज येथील श्री सर्वेश्वर महादेव वैकुंठधाम परी आखाड्याच्या आद्य जगद्गुरू शंकराचार्य त्रिकाल भवंता सरस्वतीजी महाजन यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुंभमेळामंत्री, सिंहस्थ प्राधिकरण आणि समन्वय समितीकडे निवेदन सादर केले आहे.
पुरुष साधू-संतांच्या १३ प्रमुख आखाड्यांप्रमाणे महिला साध्वी आखाड्यांनाही सनातन परंपरेत समान धार्मिक स्थान, अधिकार आणि संधी मिळाव्यात, अशी भूमिका त्रिकाल भवंता यांनी निवेदनात मांडली आहे. महिला साध्वी, तसेच महिला भाविकांना अमृतशाही स्नानात समान सहभागाची संधी मिळावी, यासाठी प्रशासनाने स्वतंत्र नियोजन करावे, असे त्यांनी म्हटले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने शाहीस्नानासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करून स्वतंत्र प्रवेशमार्ग आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शाहीस्नानाच्या मिरवणुकीत देशातील प्रमुख चौदाव्या महिला साध्वी आखाड्याचा अधिकृत सहभाग मान्य करावा, असे निवेदनात नमूद आहे.
सिंहस्थाच्या नियोजन समिती, समन्वय समिती, तसेच कुंभमेळ्याशी संबंधित धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत महिला साध्वी आखाड्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. महिला साध्वींसाठी निवास, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, आरोग्यसेवा आणि सुरक्षा या मूलभूत सुविधा पुरुष आखाड्यांप्रमाणेच उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. या मागण्यांची तातडीने पूर्तता करून संबंधित विभागांना लेखी आदेश द्यावेत, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
प्राचीन वैदिक काळापासून गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या ब्रह्मवादिनी ऋषींनी सनातन धर्माच्या पालन, जतन, संरक्षण, प्रचार आणि प्रसारात मोलाचे योगदान दिले आहे. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत आजही महिला साध्वी धर्मसेवा, अध्यात्म, संस्कार आणि राष्ट्रकार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना आवश्यक मार्गदर्शन, सहकार्य, वस्त्रे, तसेच अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.