एन्कर
---------
तीनशेहून अधिक पथके पोहोचणार नागरिकांच्या दारात
डेंगी, स्वाईन फ्लूला रोखण्यासाठी महापालिका ‘अॅक्शन मोडवर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंगी, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांसह स्वाईन फ्लूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व मलेरिया विभागाने विशेष प्रतिबंधात्मक मोहिमेची आखणी केली आहे. १० ते २० सप्टेंबर या कालावधीत शहरभर घरोघरी सर्वेक्षण राबवण्यात येणार असून यासाठी ३०० हून अधिक विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके थेट नागरिकांच्या दारात पोहोचून आरोग्य तपासणी करण्याबरोबरच डासांची उत्पत्तिस्थाने शोधून नष्ट करण्याचे काम करणार आहेत.
पावसाळ्यानंतर साथीच्या व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जून महिन्यानंतर डेंगी आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ दिसून आल्याने संभाव्य उद्रेक वेळीच रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग देण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रनिहाय विशेष पथकांची रचना करण्यात आली असून त्यामध्ये आशासेविका, बहुउद्देशीय आरोग्यसेवक, एएनएम यांच्यासह कीटक नियंत्रण विभागातील कंत्राटी कामगार व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही पथके आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील घरे, रस्ते, वसाहती, कॉलनी तसेच परिसराची आरोग्यदृष्ट्या पाहणी करणार आहेत. सर्वेक्षणादरम्यान तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात पाठवले जाणार आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी घरांची सखोल तपासणी केली जाणार असून घरात व सभोवताली साचलेले पाणी, पाणी साठवण्याची विविध साधने तसेच डास उत्पत्तीला पोषक ठरू शकणारी ठिकाणे शोधून ती तातडीने रिकामी केली जाणार आहेत. ज्या ठिकाणचा पाणीसाठा रिकामा करणे शक्य नसेल तेथे अबेटचा वापर करण्यात येणार आहे. त्यासोबतच धूरफवारणी, जंतूनाशक फवारणी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याच्या कामांनाही गती दिली जाणार आहे.
--चौकट
मोहिमेदरम्यान करण्यात येणाऱ्या सर्व कामकाजाचा दैनंदिन अहवाल निश्चित नमुन्यात तयार करून दररोज सायंकाळी पाचपर्यंत महापालिका मुख्यालयात सादर करण्याचे निर्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी क्षेत्रीय पातळीवर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. तपासणीत डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणारे पाणीसाठे किंवा अस्वच्छता आढळल्यास संबंधितांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.