दुष्काळाची चिंता, आंदोलनावरही लक्ष
महाजनांचा जरांगेंना ताठरपणा सोडण्याचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : राज्याच्या काही भागांत अतिवृष्टी होत असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर बनत असल्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता.९) सांगितले. अनेक भागांत पिके करपू लागली असून पावसाने आणखी पाठ फिरवल्यास परिस्थिती बिकट होईल. ही स्थिती कायम राहिल्यास कोरडा दुष्काळ जाहीर करण्याचा विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कृत्रिम पावसाचे प्रयोग अद्याप पूर्णपणे यशस्वी ठरले नसल्याने त्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाजन यांनी राज्यातील दुष्काळस्थिती आणि मराठा आंदोलनावर भाष्य केले. राज्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने मोठ्या शहरांमध्ये सध्या पाण्याची टंचाई जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची स्थिती नियंत्रणात असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील पिकांची अवस्था चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृत्रिम पावसाबाबत शासन माहिती घेत असले तरी यापूर्वी देशात झालेल्या प्रयोगांचा अपेक्षित फायदा झाला नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. जनावरांना आणि नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उत्सव संपेपर्यंत आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन महाजन यांनी केले. गणेशोत्सवानंतर आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा, असे सांगताना मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका ताठर नसून लवचिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारने आतापर्यंत मराठा समाजाच्या १४ मागण्या मान्य केल्या असून त्या आंदोलनातूनच पदरात पडल्याचे महाजन म्हणाले. मात्र सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, ही भूमिका योग्य नसून जरांगे यांनी ताठर भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.