टुडे साठी
---------
वाहतूक व्यवस्था, शहरी सौंदर्याला चालना
कॅनल रोड प्रकल्पासह डावा कालवा विकासाला मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कॅनल रोड प्रकल्पासह डावा कालवा विकासाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला आणि शहरी सौंदर्याला मोठी चालना मिळणार आहे. शुक्रवारी (ता. ११) झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी या निर्णयांची सविस्तर माहिती दिली. डावा कालवा साबरमती रिव्हर फ्रंटच्या धरतीवर विकसित केला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
शहराच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून, कॅनल रोड प्रकल्पाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. हा रस्ता जेहान सर्कल ते एबीबी सर्कलला जोडणाऱ्या मार्गापासून सुरू होऊन मोतीवाला कॉलेजपर्यंत जाणार आहे. या नव्या मार्गामुळे गंगापूर रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना पर्यायी आणि अधिक सक्षम वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षांपासून गंगापूर रोडवरील वाढती वाहतूक ही नाशिककरांसाठी चिंतेचा विषय बनली होती. त्या पार्श्वभूमीवर हा रस्ता वाहतुकीचे विकेंद्रीकरण करणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे. याचबरोबर गंगापूर डाव्या कालव्याच्या विकासालाही मंजुरी मिळाली असून, लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या परिसराचा विकास साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या धर्तीवर करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्याबरोबरच नागरिकांना मोठ्या प्रमाणात सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. कुंभमेळ्याच्या धर्तीवर या कालवा परिसराचा विकास करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
---चौकट
१५ सप्टेंबरला प्रत्यक्ष आढावा
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्ण तयारी केल्याचे सांगण्यात आले. आगमन, विसर्जन आणि संबंधित व्यवस्थेबाबत स्पष्ट सूचना व आवश्यक निर्देश देण्यात आले असून, उत्सव सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा पूर्ण समन्वयाने काम करत आहेत. १५ सप्टेंबरला लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन विविध कामांचा आणि गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेणार असून, त्यातून आवश्यक उपाययोजना तातडीने राबविता येणार आहेत.
--चौकट
कामांना गती
नाशिकच्या विकासासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयातून कामांना गती देण्यात येत असून, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, नदी व कालवा परिसराचा विकास आणि नागरिकांच्या आवश्यक सुविधा यावर विशेष भर दिला जात आहे. या सर्व विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पूर्ण सहकार्य मिळत असून, त्यांच्या सहकार्यामुळे प्रकल्पांना गती मिळत असल्याचे सांगण्यात आले.
--------- कोट -------
कॅनल रोड आणि डावा कालवा विकासामुळे नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेला तसेच शहराच्या सौंदर्याला चालना मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी समन्वयाने काम करत आहेत. शहराला आधुनिक, सुंदर आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त बनविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
- हिमगौरी आडके, महापौर.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.