टुडे साठी
---------
फोटो : H29792
--
पाणीटंचाईवरून सत्ताधाऱ्यांचाच एल्गार
हंडे, बाटल्या घेऊन सिडकोतील भाजप नगरसेवक थेट महासभेत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : सिडकोतील नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच महापालिका प्रशासनाला बुधवारी (ता. १६) धारेवर धरले. पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेविका प्रतिभा पवार, छाया देवांग, भूषण राणे आणि शरद फडोळ यांनी महासभेत हंडा, पाण्याच्या बाटल्या, जार घेऊन प्रवेश केला.
‘पाणी आमच्या हक्काचे’ तसेच ‘मुकणेचे पाणी मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध केला.
महापौर हिमगौरी आडके आणि आयुक्त मनिषा खत्री यांच्या उपस्थितीतच सत्ताधारी नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रभाग क्रमांक २७, २८ आणि २९ मधील पाणीपुरवठ्याची समस्या सातत्याने कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे नगरसेवकांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पवननगर येथील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा दावा नगरसेवकांनी केला. सिडकोला मुकणे धरणातून पाणी देण्याची मागणी करण्यात आली. पाणीपुरवठ्याच्या गैरनियोजनास महापालिकेचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांना जबाबदार धरत त्यांच्या बदलीची मागणी नगरसेवकांनी महासभेत केली.
---चौकट
सुरक्षारक्षकांनी अडवले
आंदोलनाचे साहित्य घेऊन नगरसेवक महासभा सभागृहात प्रवेश करत असताना सुरक्षारक्षकांनी हंडा आत नेण्यास आक्षेप घेतला. त्यावरून नगरसेवक आणि सुरक्षारक्षक यांच्यात काही काळ शाब्दिक वाद झाला. महापालिका प्रशासनाविरोधात विरोधकांकडून होणाऱ्या आंदोलनांची सवय असताना या वेळी सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिका वर्तुळात या आंदोलनाची चर्चा रंगली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.