फोटो आहे...
पावसाच्या सरींत गोविंदांचा थरार
‘गोविंदा आला रे...’च्या जल्लोषात मॅरेथॉन चौक परिसर दणाणला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी... ढोल-ताशांचा कानठळ्या बसविणारा दणदणाट... गाण्यांच्या तालावर बेभान होऊन थिरकणारे गोविंदा... आणि हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त जयघोषात एकावर एक उंचावत जाणारे मानवी थर! अखेर क्षणोक्षणी वाढत गेलेल्या उत्कंठेचा कळस झाला आणि उंचावर बांधलेली दहीहंडी फुटताच ‘गोविंदा आला रे...’च्या घोषणांनी मॅरेथॉन चौक परिसर शनिवारी (ता. ५) अक्षरशः दणाणून गेला.
गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी भाजयुमो, नाशिक महानगर आणि पोलिस बॉईज मित्रमंडळातर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आयोजक अक्षय गांगुर्डे यांच्या पुढाकाराने झालेल्या या उत्सवासाठी दुपारपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती.
एकामागून एक गोविंदा पथके परिसरात दाखल होताच उत्सवाचा रंग अधिकच गडद होत गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि लोकप्रिय गाण्यांच्या तालावर गोविंदांनी ठेका धरला. त्यानंतर सुरू झाला तो मानवी मनोरे रचण्याचा खरा थरार. एकावर एक थर चढत असताना उपस्थितांच्या नजरा क्षणभरही गोविंदांवरून हटत नव्हत्या.
खालच्या थरातील गोविंदांच्या खांद्यांवर उभा राहून वरचा थर आकार घेत होता आणि प्रत्येक थरासोबत नागरिकांच्या हृदयाची धडधडही वाढत होती. अखेर गोविंदाने उंचावर झेप घेत हंडीला स्पर्श केला आणि क्षणार्धात हंडी फुटली! टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या आणि जयघोषांनी परिसरातील वातावरण भारावून गेले.
अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी उत्साहावर विरजण पडण्याऐवजी या जल्लोषात आणखीच रंग भरला. भिजत असूनही गोविंदांचा उत्साह कायम होता. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदा पथकांना दाद दिली.
उत्सवानिमित्त सामाजिक संदेशालाही तितकेच महत्त्व देण्यात आले. उपस्थित युवकांकडून ‘नशामुक्त युवा, सशक्त समाज’ अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. दहीहंडीच्या जल्लोषातून तरुणाईने सामाजिक जबाबदारीचाही संदेश दिल्याने कार्यक्रमाला वेगळी उंची मिळाली.
शहराध्यक्ष सुनील केदार, महानगर उपाध्यक्ष सुनील फरांदे, प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, गटनेते तथा नगरसेवक श्याम बडोदे, महिला शहराध्यक्ष तथा नगरसेवक स्वाती भामरे, मध्य मंडल अध्यक्ष वसंत उशीर, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण भाटे, सरचिटणीस प्रशांत वाघ, निखिल खोडे, निखिल पवार, चित्रेश वस्पटे, रीलस्टार अक्षय बेलदार, प्रसाद बिर्ला आणि ओमकार जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
उत्सव यशस्वितेसाठी अजिंक्य फरांदे, अक्षय गांगुर्डे आणि पोलिस बॉइज मित्रमंडळाने परिश्रम घेतले. पाऊस, ढोल-ताशांचा गजर, गोविंदांचा थरार आणि नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह यामुळे मॅरेथॉन चौकातील ही दहीहंडी नाशिककरांच्या स्मरणात राहील, अशी ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.