टुडे एक ॲंकर
(महापालिका इमारत वापरावी)
---
सागर पार्क, शिवतीर्थ मैदानावर ‘डीजे’ला बंदी
क्रिकेट स्पर्धांना परवानगी; मात्र आवाजाच्या मर्यादेचे पालन बंधनकारक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : शहरातील सागर पार्क मैदानावर क्रिकेट खेळासाठी आरक्षण देण्याच्या प्रस्तावावरून गुरुवारी झालेल्या महासभेत जोरदार चर्चा रंगली. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने सागर पार्क आणि शिवतीर्थ या दोन्ही मैदानांवर डीजे व मोठ्या आवाजातील स्पीकरला बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र क्रिकेट स्पर्धांवर कोणतीही बंदी नसून मर्यादित आवाजात स्पर्धा घेण्यास परवानगी राहणार असल्याचे महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट केले.
महासभेत सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी सागर पार्कवरील क्रिकेट स्पर्धांमुळे होणारा गोंगाट, ट्रॅकवर मद्यपींकडून टाकल्या जाणाऱ्या बाटल्या तसेच अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर नगरसेवक नीलेश तायडे यांनी मैदानावरील स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केला. ॲड. दिलीप पोकळे यांनी आवाजाला मर्यादा घालून स्पर्धांना परवानगी देण्याची सूचना केली.
मैदानावर सुविधा द्या
नगरसेवक नितीन बरडे यांनी गेल्या पाच वर्षांत सागर पार्कमधून महापालिकेला सुमारे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे सांगत मैदानावरील अपुऱ्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. मैदानावर अद्याप पुरेसे पथदीप नाहीत, प्रवेशद्वार खराब आहे आणि ट्रॅकचीही दुरवस्था झाल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. त्यामुळे मिळालेल्या उत्पन्नातून या मैदानावर सुविधा देण्याची सुचना मांडली. यावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पुढील आठ दिवसांत सागर पार्कचे गेट दुरुस्त करून पथदिव्यांची व्यवस्था करण्याचे तसेच मैदान परिसराची स्वच्छता करण्याचे आदेश दिले.
चौकट
आयोजकांकडून नागरिकांना त्रास नको
दरम्यान, ट्रॅकवर व्यायाम किंवा पोलिस भरतीसाठी सराव करणाऱ्या युवकांना स्पर्धा आयोजकांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रारही सभागृहात मांडण्यात आली. त्यावर महापौरांनी नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच शुचिता हाडा यांनी शिवतीर्थ मैदानावरील डीजेमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर दोन्ही मैदानांसाठी समान नियम लागू करण्यात येणार असून, आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.