जिल्हा टुडे पान चारसाठी सेकंडमेन
------------
भुसावळच्या ताजनगरात २२ किलो गांजा जप्त
दोन संशयित ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १५ : शहरातील खडका रोडवरील ताजनगर परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करीत २२ किलो गांजा जप्त केला. सुमारे चार लाख ३९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर या प्रकरणातील अन्य दोघे संशयित फरार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे.
ताजनगर भागात दोन व्यक्ती राहत्या घरातून गांजाविक्री करीत असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिल्यानंतर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्र नरवाडे, गोपाळ गव्हाळे, उमकांत पाटील, राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी व नरवाडे यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना करण्यात आले.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी गुन्हेशोध पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, चंद्रकांत रायपूरकर, योगेश माळी, भूषण चौधरी, सचिन चौधरी, जावेद शाह, प्रशांत सोनार, महेंद्र पाटील व अक्षय कोतकर यांना कारवाईसाठी पाचारण केले.
दोन साथीदार फरार
शुक्रवारी (ता.१५) सकाळी सुमारे १२च्या दरम्यान पथकाने ताजनगर परिसरात छापा टाकला. अजीज शेख मजिद व सलिम शेख मजिद यांच्या राहत्या घरांची झडती घेतली असता, घरात २२ किलो गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत चार लाख ३९ हजार ४४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात अनस व आदिल (पूर्ण नाव माहिती नाही) हे दोघे संशयित फरार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, संशयित अजीज शेख मजिद व सलिम शेख मजिद यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. स्तानिक गुन्हे शाखेचे उमकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.