बोपेगाव आश्रमशाळेत सोमवारी ‘प्रवेशोत्सव’
जेईई-नीट प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे होणार स्वागत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : आदिवासी विकास विभागाच्या बोपेगाव (ता. दिंडोरी) येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत सोमवारी (ता. १८) नवीन शैक्षणिक वर्षाचा ‘प्रवेशोत्सव’ सोहळ्याने होत आहे. या सोहळ्यात आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखा तसेच जेईई-नीट प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाईल.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरची उत्तम संधी मिळावी, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाने मागील शैक्षणिक वर्षापासून जेईई-नीट प्रवेश परीक्षा पूर्वतयारी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत ‘फिजिक्सवाला’ या नामांकित खासगी संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ चार केंद्रांवर हे वर्ग सुरू करण्यात आले असून, त्यात बोपेगाव (नाशिक), पिसे (ठाणे), गोटेवाडी (अमरावती) आणि सिंधीविहीर (नागपूर) यांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर ‘जेईई’साठी ५० आणि ‘नीट’साठी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. बोपेगाव आश्रमशाळेतील प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, उपायुक्त संतोष ठुबे, नीलेश आहिरे, केंद्र समन्वयक तथा सहायक प्रकल्प अधिकारी प्रमिला सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणाऱ्या या महत्त्वपूर्ण ‘प्रवेशोत्सव’ सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक महेंद्र कोतकर यांनी केले.
चाळणी परीक्षेद्वारे विद्यार्थी निवड
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेशासाठी आदिवासी विकास विभाग व फिजिक्सवाला संस्थेतर्फे २२ मार्च २०२६ ला प्रवेश चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांना जेईई-नीट परीक्षेचे मोफत धडे दिले जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.