धुळे टुडे २ साठी मेन...
---
डासांची उत्पत्ती रोखणे हाच ‘डेंगी’ रोखण्याचा मार्ग
जिल्हा हिवताप अधिकारी पाटील; राष्ट्रीय डेंगी दिनानिमित्त नागरिकांना सहकार्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ ः डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एडीस इजिप्ती डासांची उत्पत्ती रोखणे हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे डेंगी आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत १६ मेस राष्ट्रीय डेंगी दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय डेंगी दिनाचे या वर्षाचे घोषवाक्य ‘Community Participation Dengue Contro:Check, Clean and Cover‘ असे आहे. डेंगी आजाराची लागण ‘एडिस इजिप्टास'' या प्रकारच्या डासांच्या विषाणू संसर्गित मादीच्या चावण्यामुळे होते. या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
डेंगीची लक्षणे
तीव्र ताप, डोकेदुखी, उलटी, अंगदुखी, डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ, तीव्र पोटदुखी आणि गंभीर रुग्णास रक्तस्त्राव.
उत्पत्ती रोखण्याचे उपाय
घराभोवती व परिसरात जिथे पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू साचू देऊ नयेत, त्या नष्ट कराव्यात. खराब टायर्स पंक्चर करावेत, पंक्चर दुकानातील टायर्स त्यात पाणी साठणार नाही, अशा पद्धतीने रचावेत. पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावेत. पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकत नाही. तसचे अंड्यांची वाढ होण्यासाठी हवा, प्रकाश मिळू शकत नाही. झाकण नसल्यास जुन्या कपड्याने झाकावेत. छतावरील टाक्यांना घट्ट झाकणे बसवावीत. शौचालयाच्या व्हेंट पाइपला जाळी अथवा कापड बांधावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून घरातील सर्व भांडी कोरडी करून घासून-पुसून घ्यावीत. परिसरातील डबकी वाहती करावीत किंवा बुजवावेत. मोठ्या डबक्यात गप्पी मासे सोडावीत. जे कंटेनर रिकामे करता येणार नाहीत अशा कंटेनरमध्ये टेमिफॉस या अळीनाशकाचा वापर करावा. कूलरमधील पाणी, फ्रीजच्या डिफ्रॉस्टिग ट्रेमधील पाणी, फुलदाण्यांमधील पाणी आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे. डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. डास प्रतिबंधक मलम/ अगरबत्ती वापरावी.
लागण झाल्यास काय करावे
डेंगी तापाची लागण झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅरासिटेमॉल गोळ्यांचा वापर करावा तसेच रक्ताची/रक्तजल नमुन्याची तपासणी करून घ्यावी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत. डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एडीस इजिप्ती डासांची उत्पत्ती रोखणे हा एकमेव मार्ग आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे असे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.
---
चौकट
डासांची अंडी वर्षभर राहू शकतात
एडिस डासांची लांबी ५-६ मिमि असते. या डासाच्या अंगावर पाढरे पट्टे असतात. त्यामुळे त्याला टायगर मॉस्क्यूटो असेही म्हणतात. हा डास दिवसा चावतो. तो लोंबकळणाऱ्या वस्तू (दोरी, वायर, छत्री, काळे कपडे इत्यादी) वर विश्रांती घेतो. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामधून पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास अळी असलेली भांडी घासून-पुसून धुऊन स्वच्छ ठेवावीत. जेणेकरून त्याची पृष्ठभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.