धुळे ः टुडे १ साठी
--
पतीला पाच वर्षे सश्रम कारावास
पत्नीचे खून प्रकरण ः साक्री तालुक्यातील पेरेजपूरची घटना
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ ः क्षुल्लक कारणावरून पत्नीवर कुऱ्हाड आणि कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची जाहीर केली. तसेच आरोपीला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास एक वर्षाचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असा आदेश दिला. सत्र न्यायमूर्ती जे. आर. पुलाटे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. राजेंद्र उर्फ राजू शिवा सोनवणे (वय ४७, रा. पेरेजपूर, ता. साक्री) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
साक्री तालुक्यातील पेरेजपूर शिवारात २५ सप्टेंबर २०२२ ला हे थरारक हत्याकांड घडले होते. आरोपी राजेंद्र सोनवणे याने पैशांच्या कारणावरून पत्नी मीनाबाई सोनवणे हिच्याशी वाद घातला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की दुपारी तीनच्या सुमारास राजेंद्रने घरात असलेल्या कुऱ्हाड आणि कोयत्याने मीनाबाई यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर, कपाळावर, पाठीवर आणि पोटावर गंभीर वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक भानुदास नऱ्हे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात सबळ दोषारोपपत्र दाखल केले होते.
डॉक्टरांची साक्ष महत्त्वपूर्ण
खटल्याच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. अजय सानप यांनी सरकार पक्षातर्फे एकूण १२ महत्त्वाचे साक्षीदार तपासले. यामध्ये पंच, घटनास्थळ पंच, तपास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा (डॉक्टरांचा) समावेश होता. मीनाबाई यांच्या शरीरावरील जखमा आणि मृत्यूचे कारण स्पष्ट करणारी डॉक्टरांची साक्ष या खटल्यात अत्यंत महत्त्वाची ठरली.
न्यायालयाकडून दोषी
सरकारी वकील सानप यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी राजेंद्र सोनवणे याला दोषी ठरवले आणि शिक्षा सुनावली. ॲड. सानप यांना जिल्हा सरकारी वकील अॅड. देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस अंमलदारांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.