संक्षिप्त पट्टा
रेल्वेत महिलेची
सुरक्षित प्रसूती
जळगाव : भुसावळ रेल्वे विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक यांनी मानवी दृष्टिकोनातून पुढाकार घेतल्याने एका महिलेची रेल्वेतच सुरक्षित प्रसूती झाली. त्यानंतर इगतपुरी रेल्वेस्थानकावरून बाळासह आई दवाखान्याकडे रवाना झाले. लोकमान्य टिळक टर्मिनस ते भुसावळदरम्यान (गाडी क्रमांक २२५३८) कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये कार्यरत असताना कल्याण स्थानकानंतर जनरल डब्यातून एका प्रवाशाने माहिती दिली की, एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत असून, जनरल डब्यात मोठी गर्दी असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य तिकीट निरीक्षक आर. एस. तेली यांनी तत्काळ कसारा स्थानक आल्यानंतर काही प्रवाशांच्या मदतीने संबंधित महिलेला सुरक्षितपणे (ए/१) या वातानुकुलित डब्याच्या कॅरी डोअर परिसरात आणले. योगायोगाने त्याच जनरल डब्यात प्रवास करणाऱ्या परिचारिका/डॉक्टर पूजा खरगे यांच्या सहाय्याने रेल्वेतच महिलेची सुरक्षित व नैसर्गिक प्रसूती करण्यात आली अन् महिलेने एका निरोगी व सुंदर कन्येला जन्म दिला.
---
केळीची कमी
दरात खरेदी
जळगाव : केळीची कमी दरात खरेदी सुरूच आहे. यामुळे शेतकरी नाराज व संतप्त झाले असून, बाजार समित्या यावर काहीएक कारवाई करीत नसल्याचा तसेच, व्यापारी व बाजार समित्या यांचे साटेलोटे असल्यानेच केळीची कमी दरात खरेदी केली जाते. त्यावर कोणतेही नियंत्रण, तपासणी व कारवाई केली जात नाही, असाही आरोप शेतकरी करीत आहेत. केळीची आवक खानदेशात कमी असली तरी कमी दरात खरेदी सुरूच आहे. केळीला उत्तरेकडे उठाव आहे. दर्जेदार केळी खानदेशात काढणीवर आहे. परंतु केळीला जे दर जाहीर होतात, त्या दरात केळीची खरेदी केली जात नसल्याने शेतकरी नाराज आहेत. यावल, रावेर, चोपडा, जळगाव बाजार समितीने यावर कारवाई करण्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. केळीचे दर १९०० रुपयांपर्यंत आहेत. पण खरेदी ११०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल या दरात अनेक भागात केली जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
---
जिल्ह्यातील शिवारात
वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
जळगाव : खानदेशात पिकांत डुकरे, रोही, नीलगायी, हरणे व अन्य वन्यप्राणी धुमाकूळ करीत आहेत. केळीसह मका, भाजीपाला पिकांची मोठी हानी होत असून, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. केळी पीक वाढीच्या व निसवणीच्या स्थितीत आहे. अनेकांचे पीक निसवले असून, काढणीवर आहे. या बागांत रानडुकरे रोज पहाटे किंवा मध्यरात्री धुडगूस घालतात. झाडांचे नुकसान करतात. यात झाड कोसळून त्यावरील घडाचेही १०० टक्के नुकसान होते. कारण एकदा झाड कोसळल्यानंतर त्यातून कुठलेही उत्पादन येत नाही. मका, तूर आदीची पेरणीही झाली आहे. या पिकांतही रानडुकरे व अन्य वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात सर्वत्र ही समस्या आहे. सातपुडालगत रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, शहादा, अक्कलकुवा या भागासह सातमाळालगत पाचोरा, चाळीसगाव, जामनेर आणि अन्य वन क्षेत्रांच्या भागात पिकांची हानी वन्यप्राणी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.