पान एक ॲंकर
----------------------
मालिकाः अन्न सुरक्षा वाऱ्यावर
‘सूट’च्या अमिषातून मुदतबाह्य वस्तू ग्राहकांच्या माथी
नुकसान कमी करण्यासाठी फंडा, एक्स्पायरी डेट'' तपासण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : उत्पादनांवर छापील किमतीमध्ये घसघशीत सूटचे अमिष दाखवत, मुदतबाह्य होण्यावर आलेल्या वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. हा प्रकार सर्वाधिक प्रमाणात मॉल्स आणि उपनगरांतील सुपरमार्केटमध्ये घडत असल्याचे उघडकीस आले. नुकसान कमी करण्यासाठी विक्रेते हा फंडा अवलंबला जात असल्याने एक्स्पायरी डेट'' तपासून मगच उत्पादन खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो आहे.
शहरातील काही नामांकित मॉल्स आणि उपनगरांतील सुपरमार्केटमध्ये फिरतान ग्राहकांची सरळ फसवणूक सुरू असल्याचे समोर आले आहे. बहुतांश वेळा ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत ''बाय वन गेट वन'' किंवा ''५० ते ७० टक्के डिस्काउंट''चा सापळा रचला जातो. प्रत्यक्षात या वस्तूंची मुदत संपण्यास अवघे काही तास किंवा दिवस शिल्लक असतात.
-------
मिठाई, बेकरी उत्पादनांमध्ये नियमास केराची टोपली
मिठाईच्या दुकानांमध्ये ट्रे समोरील उत्पादनाची आणि ते कालबाह्य होण्याच्या मुदतीचा उल्लेख करणे अन्न सुरक्षा मानके प्राधिकरणाने बंधनकारक केले आहे. असे असतानाही अनेक मिठाई विक्रेत्यांच्या दुकानात हा उल्लेखच नसल्याचे निदर्शनास आले आहे. तर काही ठिकाणी तात्पुरत्या मार्कर पेनने कच्च्या स्वरूपात माहिती नोंदवून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. ब्रेड, पाव, बनपाव यासह इतर बेकरी उत्पादनांमध्ये ''एक्स्पायरी''चा उल्लेखच केला जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर काहींकडून शाईचा शिक्का मारत, स्टीकर चिकटवत हवी ती मुदत नोंदविली जाते आहे.
-----
क्विक कॉमर्सवर ''एक्सपायरी''चा उल्लेख नाही
काही मिनिटांमध्ये घरपोहोच वस्तु पोहोचविणाऱ्या क्विक कॉमर्सचा वापर सध्या वाढला आहे. मात्र या ॲप्सवर विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंचा विशेषतः खाद्य पदार्थांच्या ''एक्स्पायरी''चा तपशील शोधणे अशक्यप्राय ठरत आहे. या ॲप व्यवस्थापनाने दर्शनी भागात ''एक्स्पायरी''ची मुदत नमूद करण्याबाबत नियम अधिक कठोर करण्याची मागणी यानिमित्त होते आहे.
----------
डिस्काउंटची भुरळ महागात
शहरातील विविध नामांकित मॉल्समध्ये घसघशीत सवलतींवर वस्तू विक्री केली जाते आहे. अशाच एका मॉलमध्ये जवळपास ५० टक्के सवलतीत ताक विक्री होत असताना, अगदी पुढील दिवशी या उत्पादनाची मुदत संपुष्टात येत असल्याचे ''सकाळ''च्या पाहणीतून समोर आले. अन्य एका घटनेत एक किलो पनीर सवलतीच्या दरात साडेतीनशे रुपये किलोने विक्री होत असल्याचे आढळले. या उत्पादनाची एक्स्पायरी तपासली असता, अवघ्या एका आठवड्याची मुदत होती. अन्य काही सवलतीच्या वस्तूंमध्येही एक्स्पायरी डेट'' जवळ आलेली असल्याचे पाहणीत समोर आले.
----------
एफएसएसएआय क्रमांक तपासा
अनेक स्थानिक पातळीवर पॅक केलेल्या पदार्थांवर एफएसएसएआयचा लोगो छापलेला असतो. दुसरीकडे अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन सर्रास केले जाते. नियमानुसार चौदा अंकांचा एफएसएसएआय नोंदणी क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. मात्र, बाजारातील अनेक पाकिटांवर हा नंबर चक्क ९, १० किंवा १२ अंकीच असल्याचे आणि काही ठिकाणी केवळ लोगो छापल्याचे गंभीर चित्र पाहायला मिळाले.
--------
असे आहे आर्थिक गणित...
यासंदर्भात मॉल व्यवस्थापनाशी अनौपचारिक चर्चा केली असता, या गोरख धंद्यातील आर्थिक गणित उलडगले. मुदत संपायला आलेल्या उत्पादनांवरील शंभर टक्के नुकसान सोसण्यापेक्षा काही प्रमाणात डिस्काउंट देत नुकसान कमी केला जात असल्याचे सांगण्यात आली. बऱ्याच वेळा मुदत बाह्य झालेल्या वस्तू हॉटेल व्यावसायिक, खाद्य पदार्थ विक्रेते यांना स्वस्तात देताना नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
------------
उत्पादनाच्या प्रकारानुरुप
अशी आहे एक्सपायरी मुदत
- ब्रेड, पाव, बन, बर्गर बन ३ ते ५ दिवस
- खारी, टोस्ट, बटर, क्रीम रोल्स ४ ते ६ महिने
- केक, पेस्ट्रीज आणि डिझर्ट्स २ ते ३ दिवस (रेफ्रिजरेटरमध्ये)
- पॅकेज्ड दूध, ताक, लस्सी २४ ते ४८ तास
- फरसाण, वेफर्स, नमकीन २ ते ४ महिने
- पॅकेज्ड ज्यूस, सॉस आणि शीतपेये ६ ते १२ महिने
---
मुदतबाह्य वस्तूंमुळे आरोग्यावर परिणाम
- अन्नातून विषबाधा होण्याची जोखीम
- ॲलर्जी किंवा श्वसनाचे त्रास
- अंगावर चट्टे उठणे, खास येण्याची तक्रार असू शकते.
- दीर्घकालीन आजारात पोट, यकृत, पचनसंस्थेचे आजाराचा धोका असतो
- काही घटकांमुळे कर्करोग होण्याचा धोका वधारतो.
-----------------
उद्याच्या अंकात वाचा खाद्यतेल बाजाराला भेसळीचे ग्रहण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.