विधान परिषद निवडणूक विश्लेषण
----
सचिन जोशी (लोगो)
--------
महायुतीच्या वर्चस्वासमोर ‘मविआ’ची सपशेल शरणागती
(लीड...)
विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकार मतदारसंघातील लढतीत भाजप महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय ही केवळ औपचारिकता होती. निवडणुकीच्या सुरुवातीला या जागेवरून भाजप-शिवसेनेत झालेली रस्सीखेच, उमेदवारीसाठी भाजपतील अंतर्गत स्पर्धा रंगली खरी. मात्र, नंतरच्या टप्प्यात ही निवडणूक अक्षरश: एकतर्फी ठरली. जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे, सर्व आमदार भाजप-शिवसेना- राष्ट्रवादीचे. पालिकांमध्ये बहुतांश ठिकाणी महायुतीचेच वर्चस्व, अशी स्थिती असताना या वर्चस्वासमोर महाविकास आघाडीची सपशेल शरणागती अपेक्षितच होती.
------
जळगावच्या जागेसाठी झालेली विधान परिषदेची निवडणूक खरेतर प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीपेक्षा भाजपतील अंतर्गत स्पर्धा, भाजप-शिवसेनेतील रस्सीखेच आणि नंतरच्या टप्प्यातील रुसवे-फुगवे या मुद्द्यांवरूनच जास्त चर्चेत राहिली. तिकडे, नाशिकला शिवसेना उमेदवाराविरोधात भाजपचे बंडखोर गोकुळ गिते रिंगणात होते. त्यांच्या माघारीसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. गिते यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर जळगावात शिवसेना बंडखोर रेश्मा कुंदन काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर ही भूमिका घेतली, तशी ती घेतली नसती, तरी भाजप उमेदवाराच्या विजयाच्या परिणामात काही बदल झाला नसता हा भाग वेगळा, पण शिवसेनेलाही आपले ‘हसू’ करून घ्यायचे नव्हते, म्हणून हा माघारीचा घोळ अखेरपर्यंत चालला.
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे सर्वाधिक अडीचशेवर सदस्य आहेत. शिवसेनेकडे दीडशेच्या जवळपास मतदार. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे)सह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) या प्रमुख पक्षांकडे दुहेरी आकड्यातील संख्या. कुणाकडेही ५० च्या वरचा आकडा नाही. जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार, दोन्ही खासदारही भाजपचे. अशी मोठी ताकद असताना, महाविकास आघाडीच्या उमेदाराचा कुठेच टिकाव लागणार नाही, हे स्पष्ट होते, पण निवडणूक तर लढायलाच हवी, म्हणून मविआकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे शरद तायडे यांना उमेदवारी देण्यात आली.
रेश्मा काळे व मतदानाच्या आदल्या दिवशी अपक्ष अनिल चौधरी यांनी महाजनांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर लढत महाजन व तायडेंमध्येच झाली. तायडेंना मिळालेली मते पाहता तिला ‘लढत’ म्हणावे का, हा प्रश्न आहे. जिल्ह्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची २३ मते असताना, तायडेंना तेवढीही मिळू नयेत, हे आणखी गंभीर. विशेष म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची मतेही महाजनांच्या पारड्यात पडल्याचे दिसते. मुळातच, या निवडणुकीचा परिणाम अर्थकारणाच्या पारड्यात मोजला जातो. उमेदवार कुठल्या पक्षाचा, यापेक्षाही तो किती खर्च करणार, हे पाहिले जाते. केवळ सदस्यसंख्या आपल्या बाजूने जास्त म्हणून निवडून येता येत नाही, हे ‘नाशिक’च्या जागेने सिद्ध केले. त्यामुळे जळगावच्या जागेवरही प्रतिस्पर्धी गोकुळ गितेंसारखा असता, तर कदाचित खऱ्या अर्थाने ‘लढत’ झाली असती.
नंदकिशोर महाजन यांना पक्षनिष्ठेचे फळही मिळाल्याचे म्हणता येईल, पण त्यांच्या उमेदवारीवरून भाजपअंतर्गत ज्या गोष्टी घडल्या, त्यांचा विचार करता भाजपत दोन सत्ताकेंद्रे तयार होताहेत, हेही या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आले. शिवसेनेचे नेते व पालकमंत्र्यांना खरेतर मुलाला आमदार करायचे होते, त्यांची ती महत्त्वाकांक्षा सध्यापुरती ‘साइड ट्रॅक’ झाली, पण संपलेली नक्कीच नसेल. त्यामुळे महायुतीतही भविष्यात संघर्ष अटळ आहे, असे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.