कामगार नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला युद्धाचे ग्रहण
---
परिपत्रकातील निकष हास्यास्पद; सांस्कृतिक चळवळीवर घाला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : शासनाच्या कामगार कल्याण मंडळ आयोजित ७१ व्या कामगार कल्याण नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी आंतरराष्ट्रीय युद्धाचे कारण देत ५ मेस स्थगित करण्यात आली. राज्य शासनाने १९ उपाययोजना प्रस्तावित करीत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सूचनांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेश निर्गमित केले. परंतु, शासनाने जारी केलेल्या परिपत्रकातील निकष पाहता त्याचा आणि नाट्य स्पर्धेचा काही संबंधच नसल्याने स्पर्धेतील रंगकर्मींनी संताप व्यक्त केला आहे.
फेब्रुवारीपासून अमेरिका, इस्राईल व इराण युद्ध १०८ दिवस चालले अन १७ जूनला संपले. त्याचे पडसाद देशभरात उमटले. सांस्कृतिक विभागाच्या राज्य नाट्य स्पर्धेपेक्षा कामगार नाट्य स्पर्धा जुनी आहे. त्यामुळे राज्यातील रंगकर्मींच्या दृष्टीने स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. शासनाने आंतरराष्ट्रीय युद्धाचे कारण देत देशातील नागरिकांना इंधन बचतीसह काटकसरीचा संदेश दिला; पण तो नियम केवळ सर्वसामान्यांना लागू असल्याचे या कलावंतांचे म्हणणे आहे. मुळात राज्य नाट्य स्पर्धेच्या तुलनेने या स्पर्धेचा खर्च कमी तसेच बक्षिसांची रक्कम कमी असल्याने स्पर्धा खर्चिक नसते. नागरिकांना काटकसरीचा संदेश दिल्यावर पहिल्या दिवशी नेतेमंडळींनी स्टंटबाजी करीत इंधन बचतीचे टिमकी वाजवली. पण, नंतर विधानसभा निवडणुकीसाठी मंत्र्यांचा ताफा राजरोज फिरू लागला. नाट्य स्पर्धेला मात्र उन्हाळा, प्रवास, हॉटेल तसेच ‘कामगारांचे हित’ कारण पुढे करण्यात आले. त्यामुळे रंगकर्मींमध्ये संतापाचे वातावरण आहे. कामगार कल्याण नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसह १६ व्या औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण रखडलेला आहे. विशेष म्हणजे सांस्कृतिक विभागाच्या ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेचा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ ३० जूनला आयोजित करण्यात आला.
कोट
स्पर्धा स्थगित करण्यासाठी जे निकष शासनाने लावले, ते चुकीचे आहेत. इंधन बचतीचा संदेश दिल्यावर पहिल्या दिवशी राजकारण्यांनी स्टंटबाजी केली. नंतर परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. मग आमचीच स्पर्धा का खुपते?
- संजय भुजबळ, स्पर्धेतील विजेते अभिनेते
स्पर्धेसाठी राज्यातून कलाकार येत असतात. स्पर्धेतून सांस्कृतिक चळवळ उभी राहते. आंतरराष्ट्रीय युद्धाचे कारण देऊन स्पर्धाच स्थगित करणे सांस्कृतिक चळवळीवर घाला घालण्यासारखे आहे.
- मुकेश काळे, स्पर्धेतील विजेते दिग्दर्शक
शासनाचे परिपत्रक रद्द झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे स्थगित झालेली स्पर्धा नेमकी केव्हा घेतली जाईल, याबाबत निर्णय झालेला नाही.
- नंदलाल राठोड, उपकल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
फोटो : २२२५१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.