लोगो- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन विशेष
------------------------
ऑलिंपिकचे लक्ष्य; नाशिकचा निर्धार!
लॉस एंजिल्स २०२८ कडे जिल्ह्यातील खेळाडूंची दमदार वाटचाल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : ऑलिंपिक पदक मिळवणे प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीचे सर्वोच्च शिखर मानले जाते. ते गाठण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील अनेक खेळाडू सध्या देश-विदेशातील स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी घाम गाळत आहेत. लॉस एंजिल्स येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेला अद्याप दोन वर्षांहून अधिक कालावधी असला, तरी पात्रता फेरीतील आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील कामगिरीची कसोटी लक्षात घेता नाशिकचे खेळाडू आतापासूनच सज्ज झाले आहेत.
उंचउडी, कनॉईंग आणि ॲथलेटिक्ससारख्या विविध क्रीडाप्रकारांत नाशिकच्या खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविला आहे. आता त्यांची नजर थेट ऑलिंपिक पदकावर आहे. काही वर्षांत जिल्ह्यातील खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान मिळविले असून, आगामी राष्ट्रकुल, आशियाई आणि जागतिक स्पर्धांमधील यशाच्या जोरावर ऑलिंपिकचे तिकीट मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
ऑलिंपिक पात्रता ही केवळ एका स्पर्धेची नव्हे, तर अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची परीक्षा असते. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आगामी प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. प्रशिक्षक, कुटुंबीय आणि क्रीडा संस्थांच्या पाठबळावर हे खेळाडू जागतिक मंचावर नाशिकचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या ऑलिंपिकमध्ये सहभागाचा अनुभव घेतलेल्या तसेच राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकांची कमाई केलेल्या खेळाडूंच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या ऑलिंपिक चक्रात नाशिककडून अधिक दमदार उपस्थितीची अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनाही या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ऑलिंपिकच्या व्यासपीठावर नाशिकच्या खेळाडूने पदक जिंकावे, हे स्वप्न आता केवळ कल्पना राहिलेले नसून त्यासाठी प्रत्यक्ष तयारी सुरू झाली आहे. दोन वर्षांत होणाऱ्या स्पर्धांमधील कामगिरीवर या स्वप्नाची दिशा निश्चित होणार आहे.
ऑलिंपिक पदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या कठोर मेहनत सुरू आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांत यश मिळवत ऑलिंपिक पात्रतेकडे वाटचाल सुरू आहे. मागील ऑलिंपिकमधील अनुभव यंदा निश्चितच उपयोगी ठरेल. देशवासीयांच्या शुभेच्छांच्या जोरावर अधिक जोमाने मैदानात उतरणार आहे.
- सर्वेश कुशारे, उंचउडीपटू
राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर आत्मविश्वास वाढला आहे. एकल आणि सांघिक अशा दोन्ही गटांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे. सैन्य दलाकडून उत्कृष्ट सुविधा मिळत आहेत. आगामी आशियाई स्पर्धेत पदक जिंकून ऑलिंपिकपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे.
-हेमंत हिरे, कनॉईंगपटू
आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव पुढील आव्हानांसाठी प्रेरणा देणारा ठरला आहे. सप्टेंबरमधील स्पर्धांवर सध्या लक्ष केंद्रित केले असून, त्यानंतर ऑलिंपिक पात्रतेसाठी प्रयत्न सुरू राहतील. नाशिकच्या धावपटूने ऑलिंपिक पदक जिंकावे, हे सर्वांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही.
- संजीवनी जाधव, धावपटू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.