फोटो : २२३४२
नाशिक : जिल्हा परिषदेत आयोजित एकल महिला मेळाव्यात महिलांना सन्मानित करताना चंद्रशेखर पगारे, सुनील दुसाने, सचिन शिंदे, सिद्धार्थ पवार, दीपाली बागले.
-----------------------------------------
एकल महिलांना हवे शासकीय योजनांमध्ये प्राधान्य
---
चंद्रशेखर पगारे : जिल्हा परिषदेत एकल महिला दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : एकल महिलांना उच्चशिक्षणासाठी शुल्क सवलत, व्यावसायिक शिक्षणासाठी विशेष आर्थिक मदत, तालुकास्तरावर समुपदेशन केंद्र, कायदेशीर मार्गदर्शन सुविधा, मालमत्ता हक्कांचे संरक्षण आणि शासकीय योजनांमध्ये अधिक प्राधान्य अशा विविध सूचना एकल महिलांनी मांडल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी दिली.
महिला व बालविकास विभागातर्फे मंगळवारी (ता. २३) जिल्हा परिषदेत आयोजित एकल महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, कौशल्य विकास अधिकारी सिद्धार्थ पवार, मुख्य महिला सत्कारार्थी दीपाली बागले, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक उल्हास पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू शिरसाठ, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार उपस्थित होते.
विभागीय उपायुक्त पगारे म्हणाले, की राज्य शासनाने २३ जून हा दिवस एकल महिला दिन जाहीर केला. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या ‘नवचेतना’ अभियानामुळे एकल महिलांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. एकल महिला, विधवा, परित्यक्ता महिला व तृतीयपंथी यांचे प्रश्न हे केवळ आर्थिक नसून, सन्मानाने जगण्याच्या हक्काशी संबंधित आहेत. मालमत्ता, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि मुलांच्या संगोपनासारख्या अनेक प्रश्नांना या घटकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या समस्यांवर सर्वसमावेशक धोरणातून उपाययोजना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा कौशल्य व नावीन्यता विभागाचे मयुरेश निंबाळकर यांनी विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सांगितली. अश्विनी गुजर यांनी सूत्रसंचालन केले. गणेश कानवडे यांनी आभार मानले. या वेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यात ३ वन स्टॉप सेंटर
जिल्ह्यात महिला व बालविकास विभागामार्फत गरजू महिलांसाठी वन स्टॉप सेंटर, राज्य महिला वसतिगृह, शिशुगृह, बालगृहे तसेच विविध संरक्षणात्मक व पुनर्वसनात्मक सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. संकटग्रस्त महिलांना तात्पुरता निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत आणि कायदेशीर सहाय्यही उपलब्ध करून दिले जाते. जिल्ह्यात नाशिक, येवला आणि मालेगाव येथे वन स्टॉप सेंटर कार्यरत आहेत. महिलांसाठी १८१ आणि बालकांसाठी १०९८ या हेल्पलाइन सेवा २४ तास विनामूल्य उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.