फोटो : H22349
-------------
के. के. वाघ शाळेत
चार दिवसीय योग कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : सरस्वतीनगर येथील के. के. वाघ सेकंडरी स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये योग दिनानिमित्त १८ ते २१ जून दरम्यान चार दिवसीय योग कार्यशाळा झाली. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मिळून या कार्यशाळेत सहभागी होत योगाचे महत्त्व समजून घेतले.
गीता विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या नाशिक विभागातील कार्यकर्त्यांनी कार्यशाळेचे संचालन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगशास्त्री डॉ. विश्वास देवकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगाचा उपयोग, एकाग्रतेवर होणारा सकारात्मक परिणाम आणि चुकीच्या सवयींमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एकाग्रता टिकवण्यासाठी करायच्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या. कार्यशाळेत स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांनी विशेष उत्साह दाखवला. विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते मोहित दुकळे, भूमिका पाटील, श्रद्धा गुरगुडे आणि रिद्धी जगताप यांनी सूर्यनमस्कारासह विविध आसनांचा सराव करून घेतला. विद्यार्थ्यांसोबतच माता-पालकांनीही आसनांमध्ये सहभाग नोंदवला. शाळेच्या प्रमुख रेखा निकुंभ यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यशाळेचे नियोजन आणि अंमलबजावणी यशस्वीपणे पूर्ण केली. कार्यक्रमानंतर के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव के. एस. बंदी, इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे समन्वयक डॉ. भूषण कर्डिले आणि मुख्याध्यापिका चित्रा नरवडे यांनी सहभागी विद्यार्थी आणि पालकांचे कौतुक केले.