एमपीएससी पूर्व परीक्षेचा २४ दिवसांत निकाल
मुख्य परीक्षेकडे उमेदवारांचे लक्ष; वेळबद्ध प्रक्रियेच्या दिशेने आयोगाचे महत्त्वाचे पाऊल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर केला आहे. विशेष म्हणजे परीक्षा झाल्यानंतर अवघ्या २४ दिवसांत निकाल जाहीर झाल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांसह त्यांच्या पालकांचे लक्ष मुख्य परीक्षेकडे लागले आहे.
कोरोना महामारीच्या काळात स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया दीर्घकाळ ठप्प होती. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर आयोगाने भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली. मात्र, प्रलंबित भरती, न्यायालयीन खटले आणि विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक परीक्षा व निकाल प्रक्रियेत विलंब होत होता. काही परीक्षांचे निकाल जाहीर झाले असले तरी त्यासाठी अपेक्षित कालमर्यादा पाळली जात नव्हती.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा प्रक्रिया वेळबद्ध पद्धतीने पूर्ण करावी, अशी मागणी उमेदवारांकडून सातत्याने होत होती. आयोगाच्या पातळीवर यासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक फलित नुकत्याच झालेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या निकालातून दिसून आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ३१ मे रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील राज्य सेवा गट-अ व गट-ब संवर्गासाठीचा निकाल सोमवारी (ता. २२) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची बैठक क्रमांकासह यादी तसेच गुणांची सीमारेषाही आयोगाने जाहीर केली आहे.
उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार पात्रता पडताळणीच्या अधीन राहून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी निर्धारित कालावधीत परीक्षा अर्ज आणि शुल्क भरणे बंधनकारक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
चौकट
परीक्षेतील महत्त्वाचे टप्पे
- परीक्षा पार पडली : ३१ मे
- पहिली उत्तरतालिका जाहीर : १ जून
- दुसरी उत्तरतालिका जाहीर : १७ जून
- पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर : २२ जून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.