सिंहस्थाच्या तयारीसाठी नाशिक पोलिसांची ‘टीम’ सज्ज
---
तीन सहायक आयुक्तांना मुदतवाढ; दोन नवे अधिकारी व एका पदोन्नत अधिकाऱ्याची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या अधिकारी वर्गाची पुनर्बांधणी सुरू केली आहे. आयुक्तालयातील मुदत संपलेल्या तीन सहायक आयुक्तांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, दोन नवे सहायक आयुक्त नाशिकमध्ये रुजू होतील. तसेच, पदोन्नतीने एका अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सिंहस्थासाठी अनुभवी आणि सक्षम अधिकारी वर्गाची ‘टीम’ तयार करण्याचे नियोजन स्पष्ट होते.
राज्य शासनाने सहायक आयुक्त तथा उपअधीक्षक पदावरील ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, २२४ पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देत सहायक आयुक्त तथा उपअधीक्षक पदावर नियुक्त केले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने दोन वर्षांपासून सुरू असलेल्या नियोजनाचा विचार करून काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आल्याचे समजते.
गृह विभागाने पंचवटी विभागाचे सहायक आयुक्त शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी आणि संदीप मिटके यांना एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. पंचवटी परिसरात सिंहस्थ आणि साधुग्राम असल्याने तेथील नियोजनात सातत्य राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाशिक ग्रामीणमधील मनमाडचे उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनाही मुदतवाढ मिळाली आहे.
दरम्यान, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी हे सहायक आयुक्त म्हणून नाशिक शहर आयुक्तालयात रुजू होणार आहेत. अकोला येथील पूनम पाटील यांचीही सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली. म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोहम माछरे यांना पदोन्नती देत सहायक आयुक्तपदी नेमण्यात आले आहे.
दुसरीकडे, सहायक आयुक्त सुधाकर सुराडकर यांची ठाणे शहरात बदली झाली. वाहतूक शाखेतील निरीक्षक रियाज शेख यांना पदोन्नती मिळाली असून, निरीक्षक सुशील जुमडे यांची नांदेड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
याशिवाय, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील कविता फडतरे आणि मुंबईतील प्रदीप मैराळे हे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होतील. दरम्यान, शहर वाहतूक विभागासाठी स्वतंत्र पोलिस उपायुक्तपद निर्माण करण्याचा आयुक्तालयाचा पाठपुरावा अद्याप प्रलंबित असून, सिंहस्थापूर्वी त्याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.