‘अग्निवीर’ प्रशिक्षणाच्या आमिषाने
पैसे उकळणाऱ्या टोळीविरोधात तक्रार
---
भोसला मिलिटरी स्कूलच्या नावाचा गैरवापर; गंगापूर पोलिसांत तक्रार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आणि भोसला ट्रस्टच्या नावाचा गैरवापर करून ‘अग्निवीर’ प्रशिक्षणाच्या आमिषाने सर्वसामान्यांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सोशल मीडियावर संस्थेचे नाव वापरून बेकायदेशीरपणे नावनोंदणी प्रक्रिया राबविली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संस्थेने केली आहे.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह मिलिंद वैद्य यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भोसला मिलिटरी स्कूलच्या नावाचा वापर करून प्रशिक्षण दिले जात असल्याच्या जाहिराती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये प्रीती विजय चव्हाण यांचे नाव व संपर्क क्रमांक देण्यात आला. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर ‘अग्निवीर’ कोर्ससाठी फॉर्म फी व कोर्स फी म्हणून प्रत्येकी दोन हजार ६० रुपये भरण्यास सांगण्यात आले.
तसेच, संबंधितांकडून स्वतःच्या कार्यालयाचा पत्ता मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या मागे असल्याचे सांगण्यात येत असून, उमेदवारांना प्रत्यक्ष प्रशिक्षण भोसला मिलिटरी स्कूलमध्येच दिले जाईल, अशी खोटी माहिती दिली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिक चौकशी केली असता, हे संघाचे काम असून, भरलेल्या रकमेची कोणतीही पावती दिली जाणार नसल्याचेही सांगितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचा जाहिरात प्रसारित करणाऱ्या प्रीती विजय चव्हाण तसेच एसपी लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी कोणताही अधिकृत संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ट्रस्टकडून त्यांना कोणतीही परवानगी अथवा अधिकार देण्यात आलेले नाहीत. संस्थेच्या नावाचा अनधिकृत वापर करून नागरिकांची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केली जात असून, त्यामुळे संस्थेची प्रतिमाही मलिन होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कोट
आमच्या संस्थेचे नाव वापरून ‘अग्निवीर’ कोर्सच्या नावाखाली पैसे गोळा केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. या प्रकरणी पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली असून, संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- मिलिंद वैद्य, कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.