पालखी मार्ग- H22432,34
‘नाथां’च्या पालखी मार्गावरील रस्त्यांची ‘वाट’
त्र्यंबकेश्वर शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामामुळे भाविकांची अडचण
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता. २४ : संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज देवस्थानची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना त्र्यंबकेश्वर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खोदकाम आणि पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलाच्या समस्येमुळे वारकरी व भाविकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे मंदिरासमोरील पालखी मार्गावरही काम सुरू असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येत्या सोमवारी (ता. २९) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यासाठी निवृत्तीनाथ ट्रस्टचा रथ सजविण्याचे तसेच मंदिर परिसराच्या सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, पालखी सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होऊ लागल्याने धार्मिक वातावरणाला उधाण आले आहे. मात्र, शहरातील विविध रस्त्यांवरील सुरू असलेल्या कामांमुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोस्ट ऑफिस रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून पोलीस स्टेशन मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे या मार्गावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. संत निवृत्तीनाथ समाधी मंदिरासमोरील रस्त्याचे कामदेखील सुरू असून याच मार्गावरून पालखी प्रस्थान करणार आहे.
कुशावर्ताच्या पारंपरिक मार्गात बदल
संत निवृत्तीनाथ मंदिरातून निघालेली पालखी प्रथम कुशावर्त तीर्थावर जाते. तेथून त्र्यंबकराजांचे दर्शन घेऊन पालखी नाशिककडे मार्गस्थ होते. मात्र, कुशावर्ताकडे जाणाऱ्या पारंपरिक मार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे यंदा मार्गात बदल करावा लागू शकतो. तसेच मंदिर परिसरातील रस्त्यांची कामे सुरू असल्याने मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना कसरत करावी लागणार आहे.
कोट
पालखी सोहळ्याला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. शहराबाहेरील वाहतुकीतही बदल करण्यात आले असून पोलिस प्रशासनाच्या समन्वयातून पालखी सुरळीतपणे मार्गस्थ होईल.
- गोविंद जाधव, मुख्याधिकारी, त्र्यंबक नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.