पान-३ ॲंकर
--------
त्र्यंबक वनपरिक्षेत्रातील पर्यटनस्थळांवर निर्बंध
--------
पावसाळी पर्यटनाविषयी निर्देश ः हरिहरगडावर दिवसाला ३०० पर्यटकांनाच प्रवेश
--------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील प्रमुख पर्यटनस्थळांवर वन विभागाने विविध निर्बंध लागू केले आहेत. ब्रह्मगिरी, हरिहरगड, दुगारवाडी धबधबा आणि पहिने येथील ‘नेकलेस फॉल’ ही ठिकाणे मद्यपान निषिद्ध क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
-----------
उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या आदेशान्वये वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात पावसाने जोर धरल्यानंतर या पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओढा वाढू लागतो. दर वर्षी पावसाळ्यात होणारी गर्दी, हुल्लडबाजी आणि अपघातांच्या घटना लक्षात घेऊन नाशिक पश्चिम वन विभागाने यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निर्बंध लागू केले आहेत.
हरिहरगडावरील अरुंद आणि अवघड पायऱ्या तसेच वाढती गर्दी लक्षात घेता दररोज केवळ ३०० पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. गडावर जाण्यासाठी किमान तीन दिवस अगोदर अधिकृत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी नसलेल्या गटांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच दुपारी तीननंतर गडावर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही.
दुगारवाडी धबधबा आणि पहिने येथील ‘नेकलेस फॉल’ येथे सकाळी आठ ते दुपारी साडेचार या वेळेतच पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. मद्यपान करून येणाऱ्या पर्यटकांना परिसरात प्रवेश नाकारला जाईल. पर्यटकांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. कड्यांवर चढाई करणे, सुरक्षारक्षक किंवा मार्गदर्शकांच्या सूचनांचे उल्लंघन करणे यांसारख्या प्रकारांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
वन विभागाने गडकिल्ले व धबधब्यांच्या परिसरात सेल्फी, छायाचित्रण तसेच रील्स बनविण्यास बंदी घातली आहे. पर्यटनस्थळांवर संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत शासन निर्णयानुसार अधिकृत शुल्क आकारण्यात येणार आहे. अतिवृष्टी किंवा आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही पर्यटनस्थळे पूर्वसूचनेशिवाय बंद ठेवण्याचे अधिकार वन विभागाने राखून ठेवले आहेत. वन विभागाने पर्यटकांना नियमांचे पालन करून सुरक्षित पर्यटनाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.