धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
--
खंडणीची मागणी;
चौघांविरुद्ध गुन्हा
धुळे : खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन एका विटाभट्टी व्यावसायिक शेतकऱ्याकडे साडेतीन लाख रुपये रोख आणि दहा हजार विटांची खंडणी मागितल्याचा प्रकार मालपूर (ता. शिंदखेडा) येथे उघडकीस आला. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात चार संशयितांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत कैलास भगवान पाटील (रा. मालपूर) यांच्या फिर्यादीनुसार मेच्या शेवटच्या आठवड्यापासून ते १५ जूनदरम्यान संशयित विजय इंदवे याने कैलास पाटील यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात पूर्वी दाखल एका गुन्ह्याचा आधार घेत पुन्हा खोटी व वाढीव अॅट्रॉसिटी लावण्याची धमकी दिली. हा खोटा गुन्हा दाखल न करण्यासाठी विजय इंदवे, गणेश इंदवे, रावसाहेब इंदवे आणि मध्यस्थी संतोष इंदवे (सर्व रा. मालपूर) यांनी संगनमताने कट रचला. त्यांनी कैलास, त्यांचा मुलगा आणि भाऊ यांच्याकडे दहा लाख रोख रकमेची मागणी केली. तडजोड करीत ही रक्कम पाच लाख आणि सरतेशेवटी साडेतीन लाख रोख व दहा हजार विटा देण्याची खंडणी मागितली. चौघांनी कैलास पाटील यांना मालपूर शिवारातील शेतात, गावात, मोबाइलवर तसेच धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषणाच्या ठिकाणी भेटून पैशांसाठी दबाव टाकला. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक राजन दुसाणे तपास करीत आहेत.
-
ट्रॅक्टर उलटून
शेतकऱ्याचा मृत्यू
धुळे : शेतात काम करताना ट्रॅक्टर उलटून त्याखाली दाबले जाऊन शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २३ जूनला सकाळी फागणे (ता. धुळे) येथे घडली. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली. दीपक नथू पाटील (वय ४८, रा. फागणे, ता. धुळे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचे भाऊ प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीनुसार दीपक पाटील हे २३ जूनला सकाळी सातच्या सुमारास फागणे शिवारातील शेतात ट्रॅक्टरने (एमएच १८ सीएन ००५४) काम करत होते. शेतातील बांधावरून ट्रॅक्टर चालवत असताना त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाले आणि दीपक पाटील हे त्याखाली दाबले गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वतःच्या निष्काळजीपणामुळे स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा दाखल झाला.
-
फवारणीतून विषबाधा;
शेतकऱ्याचा मृत्यू
धुळे : शेतात भाजीपाला पिकावर फवारणी करताना औषध नाकातोंडात गेल्याने निमगूळ (ता. धुळे) येथील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भूषण कैलास अहिरे (वय ३२) असे त्याचे नाव आहे. ही घटना २३ जूनला सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. त्यांना मळमळ, उलटी अशा त्रासामुळे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली.
-
गळफास घेतल्याने
एकाचा मृत्यू
धुळे : हातनूर (ता. शिंदखेडा) येथे एका व्यक्तीने घरातच गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. लोटन भिला पाटील (वय ४१) असे त्यांचे नाव आहे. पत्नी २३ जूनला सकाळी बाहेर गेली असताना लोटन पाटील यांनी घरात गळफास घेतला. पत्नीने घरी आल्यावर ही घटना पाहिली. त्यांना ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.