एक ‘क्लिक’ अन् ९७ लाखांवर डल्ला
---
भुसावळच्या ठेकेदाराची सायबर चोरांकडून फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : भुसावळ येथील शासकीय ठेकेदाराला व्हॉट्सॲपवर आलेली ‘एपीके फाइल’ क्लिक करणे महाग पडले असून, सायबर चोरांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ९७ लाख ५० हजार रुपये लंपास केले. मात्र, ठेकेदाराने वेळेत जळगाव सायबर पोलिसांकडे धाव घेतल्याने पोलिसांनी तातडीने हालचाली करत एकूण ४० लाख रुपये गोठविण्यात (फ्रीज) यश मिळविले.
भुसावळ येथील रहिवासी तथा शासकीय ठेकेदार विलास जयराम पाटील गुरुवारी (ता. २५) मुंबई कार्यालयात असताना, त्यांच्या व्हॉट्सॲपद्वारे एका अनोळखी क्रमांकावरून एपीके फाइल आली. अनवधानाने विलास यांनी त्यावर क्लिक केल्याने नकळत त्यांच्या मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांनी मिळवून इंडस बँकेच्या खात्यातून ९७ लाख ५० हजार रुपये लंपास केले.
अकाउंटटला आला मेसेज
सायबर गुन्हेगारांनी विलास पाटील यांच्या मोबाईलचा ताबा मिळविल्यावर मोबाईलच्या डाटा हिस्ट्रीद्वारे कंपनीचे अकाउंटट सागर पारधी यांना वेळोवेळी पाठविलेले मेसेजेस व त्यांचा रिस्पॉन्स मेसेजेस बघून तत्काळ त्यांना मालकांच्या मोबाईल क्रमांकावर अमुक एका अकाउंटवर ९७ लाख ५० हजार पाठविण्याचा मेसेज मिळाला. पारधी यांनी मालकांचा मेसेज म्हणून तत्काळ संबंधित मेसेजची दखल घेत रक्कम संबंधित खात्यात वर्ग केली.
फोन केल्याने उलगडा
विलास पाटील ॲन्ड असोसिएट्स या कंपनीच्या खात्यातून ९७ लाख ५० हजार रुपये पाठविल्यानंतर पारधी यांनी मालकांना फोन केला व आपण सांगितल्याप्रमाणे मी अमुक एका खात्यात रक्कम वर्ग केल्याचे सांगितले. घडला प्रकार ऐकून मालकांनी मेसेज केला नसल्याचे सांगताच पारधी यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तत्काळ त्यांनी आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केल्यावर मालकांनी तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच्या सूचना केल्या.
सायबर पोलिसांची तत्परता कामी
याबाबत तक्रार देण्यासाठी कंपनीचे अकाउंटंट सागर पारधी पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, नीता राजपूत व स्वाती पाटील यांनी तत्काळ तांत्रिक तपासाला गती देत शोध सुरू केला.
चौकट
सायबर गुन्हेगारांवर सायबर पोलिसांची कडी
तक्रारदार सागर पारधी यांनी घडला प्रकार सांगताच उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांनी इंडस बँकेच्या प्रशासनाला मेलद्वारे खात्यातून वर्ग झालेली रक्कम फ्रीज करण्याबाबत कार्यवाहीला गतिमान केले. तक्रारदार पोलिस ठाण्यात पोहोचायला तीन तास विलंब झाल्याने सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या शहरातून पैसे विड्रॉल करण्यास सुरुवात केली होती. तरी त्यांच्या वेगावर मात करीत अर्ध्याच तासात ४० लाखांची रक्कम फ्रीज करण्यात मिर्झा यांना यश आले.
चौकट
खात्यात होते अडीच कोटी
विलास पाटील ॲन्ड असोसिएट्स कंपनीच्या खात्यात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास जवळपास अडीच कोटींची रक्कम होती. सायबर गुन्हेगारांनी पूर्णच्या पूर्ण रकमेवर डल्ला मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.