जिल्हा परिषदेने सीबीएसई पॅटर्न गुंडाळला
मराठी व सीबीएसई शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भेदाभेद निर्माण होण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२६ : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी (सीबीएसई) प्रमाणे शिक्षण मिळावे या उद्देशाने राबविण्यात येणारा ‘सीबीएसई पॅटर्न’ रद्द करण्यात आला आहे. या उपक्रमातून राज्य शिक्षण मंडळ आणि सीबीएसई असा भेद निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला.
जिल्हा परिषदेच्या एकूण ४२३८ शाळा आहेत. येथील ४ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १०० शाळा ‘सीबीएसई पॅटर्न’वर आधारित तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यादृष्टीने गट शिक्षणाधिकार्यांना पत्र पाठवून त्यांच्याकडून शाळांची नावे मागवली होती. गट शिक्षणाधिकार्यांनीही प्रत्येक तालुक्यातील दोन ते तीन शाळांची नावे सूचवली. निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना जिल्हा परिषदेने हा उपक्रम अचानकपणे रद्द केला आहे. यामागील कारणे जाणून घेतली असता राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाने आपल्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करत ‘एनसीईआरटी’च्या धर्तीवर आपला अभ्यासक्रम तयार केला. परिणामी, ‘स्टेट बोर्ड’ आणि ‘सीबीएसई’ यांच्यातील अभ्यासक्रमाचे अंतर कमी झाले आहे. विद्यार्थ्यांना काठिण्य पातळी अधिक असलेला अभ्यासक्रम शिकायला मिळत असेल तर ‘सीबीएसई’चा पॅटर्न राबवून काय साध्य होणार असा प्रश्न उपस्थित झाला. तसेच विद्यार्थ्यांमध्येही ‘स्टेट बोर्ड’ व ‘सीबीएसई’ शाळा भेदभाव निर्माण होवू शकतो, असाही अंदाज वर्तविण्यात आला. आपल्या शाळांमधे भेदाभेद निर्माण करण्याऐवजी हा उपक्रम रद्द करणे शिक्षण विभागाला सयुक्तिक वाटले. त्यामुळे जिल्हा परिषदेने आपला ‘सीबीएसई पॅटर्न’ रद्द केला.
….
काय होता उपक्रम?
जिल्हा परिषदेचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधे यशस्वी होण्यासाठी ‘सीबीएसई पॅटर्न’ राबविण्याचा विचार सीईओ ओमकार पवार यांनी मांडला होता. त्यासाठी जिल्ह्यातील शाळांची निवड करून त्यांना विशेष सुविधा पुरविल्या जातील. जेणेकरून विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमाची गोडी निर्माण होईल, यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येणार होता.
….
सीबीएसई अभ्यासक्रम ‘एनसीईआरटी’ मार्फत ठरविला जातो. स्टेट बोर्डानेही आपल्या अभ्यासक्रमात बदल करून त्याची काठिण्य पातळी वाढविली आहे. त्यामुळे आता ’सीबीएसई’ व स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमात फार कमी फरक दिसून येतो. या पॅटर्ननुसार शाळा निर्मितीचा हेतू साध्य झाल्यामुळे आता हा उपक्रम थांबविला आहे.
- साईलता सामलेटी, प्राथमिक शिक्षणाधिकारी (नाशिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.