टुडे ४ मेन फिचर
NSK26H28343
जळगाव : गांधी मार्केटमध्ये दुकानांच्या बाहेर अतिक्रमण करणारे गाळे सील करताना गाळे महापालिकेचे कर्मचारी.
..........
गांधी मार्केटमधील अतिक्रमित गाळ्यांना ‘सील’
ओटे उभारून सार्वजनिक जागेवर ताबा; अन्य संकुलेही मनपाच्या ‘रडार’वर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : थकीत भाडे वसुलीसाठी सुरू असलेल्या कारवाईनंतर आता महापालिकेने व्यापारी संकुलांमधील नियमबाह्य बांधकामे आणि अतिक्रमणांकडेही मोर्चा वळविला आहे. गांधी मार्केटमध्ये दुकानाबाहेर ओटे उभारून सार्वजनिक जागेचा वापर करणाऱ्या फरसाण व खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे दोन गाळे सोमवारी महापालिकेच्या पथकाने कारवाई करीत ते सील केले. या कारवाईमुळे शहरातील इतर व्यापारी संकुलांमधील नियमबाह्य बांधकामधारकांचेही धाबे दणाणले आहेत.
गांधी मार्केटमधील संबंधित गाळेधारकांनी दुकानाच्या निर्धारित हद्दीबाहेर ओटे व अतिरिक्त बांधकाम करून व्यवसायाचा विस्तार केला होता. त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करण्यास तसेच बाजारातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. सार्वजनिक जागेचा अशा प्रकारे वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कारवाई केली. आयुक्त आदित्य जीवने यांच्या मार्गदर्शनाखाली किरकोळ वसुली विभागाचे अधीक्षक गौरव सपकाळे आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गांधी मार्केटवर लक्ष
गेल्या आठवड्यात गोलाणी मार्केटमध्ये सलग तीन दिवस कारवाई करीत थकीत भाडे असलेल्या गाळ्यांना सील ठोकण्यात आले होते. आता गांधी मार्केटमधील अतिक्रमित गाळ्यांवर झालेल्या कारवाईमुळे महापालिका केवळ थकबाकीदारांपुरती मर्यादित न राहता नियमबाह्य बांधकामांवरही कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकट
फुले मार्केटकडेही नजर?
दरम्यान, गांधी मार्केटप्रमाणेच शास्त्री टॉवर संकुल, फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केटमधील बहुतांश दुकानांमध्ये निर्धारित रचनेत बदल करून तसेच विनापरवानगी बांधकाम केल्याची चर्चा आहे. दुकानांच्या मूळ रचनेत बदल करून अतिरिक्त जागेचा वापर होत असल्याने या संकुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याचे बोलले जाते. त्यामुळे गांधी मार्केटमध्ये कारवाई केल्यानंतर महापालिकेचा पुढील हातोडा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट आणि शास्त्री टॉवर संकुलातील नियमबाह्य बांधकामांवर पडणार का, असा प्रश्न जळगावकरांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेची पुढील कारवाई आता कोणत्या मार्केटकडे वळते, याकडे व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.