अशोक खरातच्या जामिनावर
१६ पर्यंत सुनावणी लांबणीवर
महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कॅप्टन ऊर्फ भोंदू अशोककुमार खरात याच्या जामीन अर्जावरील सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे सत्र न्यायालयात उपस्थित राहत खरातच्या जामिनाला कडाडून विरोध केला.
खरात याने स्वतःला दैवी अवतार सांगत पीडित महिलांवर अत्याचार केला होता. याप्रकरणी गेल्या १७ मार्चला सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल होताच, पहाटे तीनला नाट्यमयरीत्या खरातला अटक करण्यात आली होती. यानंतर एकापाठोपाठ एक नऊ गुन्हे खरातविरोधात दाखल झाले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शासनाने एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केली. तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्याचा तपास करण्यात आला. या प्रकरणी आत्तापर्यंत आठ गुन्ह्यांपैकी सहा गुन्ह्यांत दोषारोपपत्र सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले असून, अजून दोन दोषारोपपत्र दाखल होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील निकम यांनी दिली.
अशोक खरात मार्चपासून पोलिस कोठडी आणि नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. जिल्हा न्यायालयाकडे त्याने जामिनासाठी धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी (ता. ३१) सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे न्यायालयात हजर होते. परंतु खरातचे वकील अनुपस्थित होते. या वेळी ॲड. निकम यांनी खरातच्या जामीन अर्जाला विरोध करताना, महिलांवरील अत्याचाराचे एक नव्हे, तर आठ गुन्हे दाखल असल्याने गुन्ह्यांचे गांभीर्य पाहता गुन्हा जामीनपात्र असला तरी खरात जामिनास पात्र नसल्याचा युक्तिवाद करीत जामिनाला विरोध केला. न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर पुढील सुनावणी १६ सप्टेंबरला होईल, असे सांगितले.
कोट
अशोक खरात याने जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र त्याच्याविरोधातील काही गुन्ह्यांचे दोेषारोपपत्र अद्यापही सत्र न्यायालयात वर्ग झालेले नाहीत. तसेच त्याच्याविरोधातील गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने जामिनास विरोध करण्यात येईल.
- ॲड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील