लेखक फोटो - NSK26H28356
प्रा. नितीन खैरनार
उपशीर्षक
मातीशी नाते, खेळाशी निष्ठा
-----------------------
मुख्य शीर्षक
कसमादेची क्रीडा भरारी
शेती आणि कृषी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या कसमादेच्या मातीत आता क्रीडा गुणवत्तेचीही नवी पेरणी होत आहे. विविध खेळांतील खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत असले, तरी त्यांना अत्याधुनिक सुविधा, शास्त्रीय प्रशिक्षण आणि अनुभवी प्रशिक्षकांची सक्षम साथ मिळणे गरजेचे आहे.
- प्रा. नितीन खैरनार, मालेगाव
कसमादे परिसरात प्रामुख्याने कबड्डी, खो-खो, फुटबॉल, बॅडमिंटन, योगासन, ॲथलेटीक्स, कुस्ती, कराटे, क्रिकेट, बुद्धीबळ, सायकलींग यासारख्या खेळांना खेळणारा मोठा वर्ग मुलांचा, मुलींचा व वयस्क लोकांचा आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील मुलांमध्ये शारिरीक क्षमता व मेहनत करण्याची तयारी हे दोन प्रभावशाली गुण उपजतच असतात. ग्रामीण भागातील खेळाडू तालुका, जिल्हा, विभाग, राज्य किंवा राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचण्यासाठी त्यास अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सरावामध्ये नियमितता, दर्जेदार साधनांचा अभाव, तांत्रिक व वैज्ञानिक प्रशिक्षण आहाराबद्दल मार्गदर्शन, फिटनेस प्रशिक्षण, दुखापतीशी सामना करण्याचे योग्य मार्गदर्शन नसल्याने अनेक गुणवंत खेळाडू मागे राहत असल्याची क्रीडा क्षेत्राची भौगोलीक रचना दिसते.
मालेगाव परिसरात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या दूरदृष्टीमुळे क्रीडा संकुले, शाळांची मैदाने, प्रत्येक प्रभागातील आरक्षीत जागांना कुंपण घालून खुली जिम, छत्रपती शिवाजी जिमखाना येथील सिंथेटिक कोर्ट, तालुका क्रीडा संकुल व इनडोअर सुविधा हे सर्व प्रशंसनीय आहे. परंतु वाढत्या खेळाडूंच्या संख्येच्या तुलनेने सुविधा अपुऱ्या वाटतात. अपुऱ्या सुविधांचा अभाव म्हणजे प्रमुख खेळांसाठी प्रशिक्षण केंद्र, त्याकरिता असणारे फिटनेस केंद्र, नावीन्यपूर्ण उपकरणे, प्रशिक्षक, फिजिओथेरपी, स्पोर्ट्स न्यूट्रीशियन, खेळाडूंच्या वैज्ञानिक कामगिरीचे मूल्यांकन करणारी अत्याधुनिक व्यवस्था या बाबींचा उल्लेख करता येईल. अनुभवी प्रशिक्षकांचा अभाव ही मोठी खंत या क्षेत्राला सतावत आहे. क्रीडा क्षेत्रातील हेच सर्वात मोठे आवाहन अद्ययावत ज्ञान असलेल्या प्रशिक्षकांची ‘कसमादे’ला मोठी गरज आहे. या परिसरात अनेक उत्साही व्यक्ती उभ्या राहून प्रशिक्षण देण्याचे कार्य करताना दिसतात. प्रशिक्षक अनुभवी असला तर बायोमेकॅनिक्स, स्पोर्ट्स सायन्स, स्ट्रेंथ व कडीशनिंग, खेळाडूंचे मानसशास्त्र आणि दुखापतीचे शास्त्र शुद्ध प्रशिक्षण कुठेही उपलब्ध नाही. बुद्धीबळ योगासन, कॅरम या सारख्या खेळाला मोठ्या मैदानाची गरज नसते. म्हणून प्राथमिक शाळेतच यांचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
भविष्यात मालेगाव व कसमादे परिसरात स्पोर्ट्स अकादमी मॉडेल विकसित करणे, क्रीडा नर्सरी उभारणे अत्यावश्यक आहे. असे झाल्यास या संस्थांना एक किंवा दोन खेळांवर लक्ष केंद्रित करून वयोगटानुसार प्रशिक्षण सहजरित्या देता येईल. विविध स्पर्धांचे नियोजन, पालकांसाठी व खेळाडूंसाठी विशेष खेळ मार्गदर्शन, चर्चासत्र आयोजित करणे आवश्यक आहे. क्रीडा हा केवळ छंद राहिला नाही, आता तो रोजगार आणि उद्योगाचे क्षेत्र बनत आहे. कारण यामुळे खालील क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षक, फिटनेस ट्रेनर, फिजीओथेरपीस्ट, स्पर्धा पंच, क्रीडा व्यवस्थापक, क्रीडा पत्रकार, स्पोर्ट्स फोटोग्राफर आणि इव्हेंट मॅनेजर यांची व्यवस्था करण्याची गरज आहे. कारण स्पर्धात्मक खेळांचे आयोजन केले तर क्रीडा साहित्य, गणवेश, खेळाडूंचे बूट, आहार, प्रवास, निवास, मैदानांचे व्यवस्थापन व जाहिरात क्षेत्र यांची मोठी उलाढाल होऊ शकते. म्हणून क्रीडा क्षेत्रात केलेली गुंतवणूक ही खर्च नसून आरोग्य, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत केलेली गुंतवणूक मानली पाहीजे.
‘कसमादे’च्या क्रीडा इतिहासात शूटिंग बॉल या खेळाचा विशेष उल्लेख करावा लागेल. मालेगावचा वकार अंजुम अब्दुल मलीक व मो. जाहीद अब्दुल गफार यांनी भारतीय शूटिंग बॉल संघाचे प्रतिनिधित्व करून शहराला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे. सहनशक्ती व फिटनेसच्या क्षेत्रातील आयर्न मॅन सुमेध शशिकांत वाव्हळ यांचे उदाहरण प्रेरणादायी आहे. फ्रान्समधील व्हीशी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन ट्रायथलॉनमध्ये त्यांनी यश मिळविले आहे. स्थानिक पातळीवरील खेळाडू अनेक साधनांच्या अभावावर मात करून योग्य तयारी व निधीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय आव्हानांवर मात करू शकतो. मालेगावातील बेसबॉलमधील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत अनेक राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणारी कु. मंजूषा पगार हिने चीनमध्ये झालेल्या बेसबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्राचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. सुरेखा दप्तरे यांचे मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे. क्रिकेट खेळ तर मालेगावची अजब शान आहे. शेकडो संघ एकाच मैदानावर खेळताना या गावात दिसतात. या क्षेत्रात हर्षद जाधव, धिरज जाधव हे उल्लेखनीय नावे आहेत.
चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये भारताचे रोईंग खेळात प्रतिनिधित्व करणारे दत्तू भोकनळ यांनी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि अर्जुन पुरस्कारदेखील मिळविला आहे. कळवण तालुक्यातील गौरी चव्हाणके, तेजल देवरे यांनी रायफल शूटिंग तर मालेगाव पिस्तल शूटर रूद्राक्ष खैरनार याने राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. राज्यस्तरीय युवा महोत्सवात कळवणच्या अर्जुनसागर कबड्डी संघानेही मजल मारली आहे. देवळ्याच्या बॉल बॅडमिंटन संघाने ६४ वी बॉल बॅडमिंटन वरिष्ठ संघाची स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच देवळ्याचा रस्सीखेच या खेळात मोठा दबदबा आहे.
मालेगावातील क्रीडा चळवळीला चालना देणारे प्रशिक्षक भिकू खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना अनेक लांब पल्ल्याचे मॅरेथॉन पटू घडले आहेत. यात नुकतीच ४२ किमी मॅरेथॉन पूर्ण करणारी मालेगावची पहिली महिला धावपटू वैशाली दीपक शेलार यांचा उल्लेख करता येईल.
कसमादे परिसरात विविध खेळांचे अनेक प्रतिभासंपन्न खेळाडू गेल्या दशकामध्ये तयार झाल्याचे वृत्तपत्राच्या अभ्यासाअंती समजते. आता नाशिक प्रमाणेच एखादा सिंथेटिक ट्रॅक, उत्तम असा स्केटिंग ट्रॅक, ऑलिम्पिक धरतीचा जलतरण तलाव, बास्केटबॉल खेळाची मैदाने, बुद्धिबळ खेळाच्या प्रसारासाठी आधुनिक मार्गदर्शकांची आवश्यकता क्रिकेटसारख्या खेळाला चालना देण्याकरिता अजीज कल्लू स्टेडियम सारखेच भव्य दिव्य स्टेडीअमची गरज मालेगावच्या बाह्य भागाला आहे. योगासन या क्रीडा प्रकारात मालेगावच्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर चुणूक दाखविली आहे.
आता या क्षेत्राला परिवर्तनाची नितांत गरज आहे. परंतु यासाठी सेवाभावी संस्था, सरकारी दालने यांनी पुढाकार घेऊन एखादा खेळ किंवा खेळाडू दत्तक घ्यावा, म्हणजे परिवर्तनास सुरुवात होणार यात शंका नाही. खेळाकरिता क्रीडा प्रबोधिनी उभारावी व यात योग्य मार्गदर्शकांना नेमावे म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यवृद्धी होणार आहे. कारण खेळाचे नामवंत शोधायचे असतील तर तालुक्यांतील एक एक छोटे गाव पिंजून काढले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळांकरिता खऱ्या अर्थाने स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. खरा गुणवंत खेळाडू येथेच सापडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.