फोटो : H28338, H28331
...
कुशावर्त तीर्थावर चेंगराचेंगरी थोडक्यात टळली
प्रशासनाची नियोजन करताना कसरत; कुंभमेळा ठरणार आव्हानात्मक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांची तोबा गर्दी झाल्याने त्याचे व्यवस्थापन करताना पोलिसांसह जिल्हा प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली. कुशावर्ताकडे जाणारे आणि स्नान करून बाहेर पडणारे भाविक एकाच मार्गाने ये- जा करू लागल्याने अगदी चेंगराचेंगरी होण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. महत्त्वाचे म्हणजे, ही परिस्थिती बघून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्वत: गर्दीचे नियोजन केले. प्रशासनाला अपेक्षित गर्दीपेक्षा दुप्पट भाविक दाखल झाल्याने आत्ताच अशी परिस्थिती उद्भवल्याने पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळा हा प्रशासनासाठी आव्हानात्मक राहिल, हे तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने प्रशासनाला अनुभवायला मिळाले.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी दोन दिवसांत साधारणतः चार लाख भाविकांनी ब्रह्मगिरी फेरीसह कुशावर्त तीर्थ आणि दर्शनाचा लाभ घेतला. यंदाच्या फेरीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रंगीत तालीम म्हणून बघण्यात आले. त्यामुळे नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनाचे नियोजनाकडे लक्ष लागून होते. पहिल्या श्रावणी सोमवारी तहसीलदार गणेश जाधव व नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी फेरी मार्गाची पायी पाहणी केली; येथील सुविधा वाढविल्या. तसेच पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी कुशावर्त तीर्थावरील बंदोबस्त वाढवला. तरीही दोन दिवसांत एक ते दीड लाख भाविकांनी कुशावर्तात स्नान केले. रविवारी रात्रभर आणि सोमवारी दिवसभर भाविकांचा ओघ होता. भगवान शंकराच्या मंदिराकडून भाविक थेट कुशावर्तात दाखल होत राहिले. त्यांच्या येण्याचा मार्ग हा थेट कुशावर्तापर्यंत बॅरेकेट्स लावून व्यवस्थित केला होता. मात्र, कुशावर्तात स्नान झाल्यानंतर परत जाताना भाविक त्याच मार्गाने फिरत असल्यामुळे एकाच ठिकाणी जाणारे आणि येणारे भाविक एकमेकांना ‘क्रॉस’ झाल्याने या ठिकाणी नियोजन करणे अवघड गेले. त्यातून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी तातडीने गर्दी दोन टप्प्यात विभागली. मात्र, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रातांधिकारी पवन दत्ता, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना मैदानात उतरावे लागले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आयुक्त शेखर सिंह यांनी गर्दीचे नियोजन केले. पोलिस निरीक्षक चौधरी यांनी तातडीने अतिरिक्त कुमक मागवून गर्दी आटोक्यात आणल्याने कुठलीही दुर्दैवी घटना घडली नाही.
…चौकट
जिल्हाधिकारी अडकले गर्दीत
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कुशावर्तावर पायी येताना त्यांनाही गर्दीतून मार्ग काढावा लागला. अंगरक्षक व पोलिसांनी भाविकांच्या गर्दीतून मार्ग काढून त्यांना कुशावर्ताजवळील चौथऱ्यावर जागा मिळवून दिली. त्यांनी तातडीने सूत्रे हाती घेत गर्दी नियंत्रणासाठी पोलिस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कामाला लावून तासाभरात गर्दीवर नियंत्रण मिळवले.
…बुलेटस
या उपाययोजनांची नितांत गरज
*कुशावर्त तीर्थाशेजारील प्राचीन कुंडावर जाळी बसविणे
*वाळलेल्या वडाच्या झाडाभोवती तयार केलेला चौथरा कमी करणे
*भगवान शंकराच्या मंदिराकडून येणारे भाविक आणि कुशावर्त तीर्थातून बाहेर पडणारे भाविक यांच्यासाठी वेगवेगळे मार्ग
*महिला व पुरुषांसाठी वस्त्रांतरगृह वाढविणे
* कुशावर्त तीर्थाशेजारील अतिक्रमण काढणे
--कोट
तिसरा श्रावणी सोमवार हा आमच्यासाठी रंगीत तालीम असल्यामुळे त्या दृष्टीने गर्दी नियोजनाचा विचार केला. सिंहस्थानिमित्त येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन येत्या काळात काही बदल निश्चितपणे करणार आहोत.
-शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण
…कोट
श्रावणी सोमवारी आलेल्या भाविकांची संख्या बघता येत्या काळात काही बदल आपल्याला तातडीने करावे लागतील. यापूर्वी आम्ही काही बदल केले आहेत. जेणेकरून भाविकांना अगदी सहजपणे दर्शन आणि स्नानाचा आनंद घेता येईल.
-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
…कोट
श्रावण महिना संपताच कुशावर्त तीर्थाजवळील कामांना सुरुवात होणार आहे. यासाठी कुशावर्त तीर्थ बंद ठेवण्याची वेळ आली तरी काही दिवसांसाठी असा निर्णय घेतला जाईल. जेणेकरून सिंहस्थात गर्दीचे नियोजन व अधिक भाविकांना स्नान, दर्शन घेता येईल.
-गोविंद जाधव, मुख्याधिकारी, त्र्यंबक नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.