मेन
फोटो : H28334, H28332, H28327, H28324, H28321, H28326, H28329
…
बम, बम, भोले !
तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ४ लाख भाविकांकडून ब्रह्मगिरी फेरी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविकांनी बम, बम भोलेच्या गजरात ब्रह्मगिरी फेरी पूर्ण केली. रविवारी (ता. ३०) रात्रीपासून विविध मार्गांनी दाखल झालेल्या सुमारे ४ लाख भाविकांनी फेरीसह कुशावर्त तीर्थात स्नान केले. विशेष म्हणजे पहिल्या सोमवारच्या तुलनेत आज दर्शनासाठी मंदिरात भाविकांची संख्या कमी होती. मात्र, फेरीमध्ये यंदा महिला व युवकांचे प्रमाण सर्वाधिक दिसून आले.
श्रावणात त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी फेरी प्रदक्षिणेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाखो भाविक या दिवशी या फेरीत सहभागी होतात. रविवारी रात्री आठपासून भाविकांनी कुशावर्तात स्नान करून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली. बम बम भोलेच्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली. सकाळी प्रदक्षिणा मार्गावर विविध ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांकडून भाविकांसाठी चहा आणि अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी काही भाविक मध्यरात्रीपासून मार्गस्थ झाले. तर काही भाविक पहाटे प्रदक्षिणेला रवाना झाले. भाविकांची गर्दी पाहता पोलिसांनी काही ठिकाणी ही गर्दी थांबवली. यामध्ये कुंभमेळा बसस्थानक, जव्हार रोड, पोलिस ठाणेमार्गे सुंदराबाई मठ आणि त्यानंतर कुशावर्त तीर्थ असा भाविकांच्या हालचालींचा मार्ग ठरविण्यात आला. दुसरीकडे, खासगी वाहनांना तळेगाव, प्रयागतीर्थ, गजानन महाराज संस्थान येथे अडविण्यात आले. यंदा फेरीत महिला, मुलींचे प्रमाण अधिक होते.
रात्री गजानन महाराज संस्थान, पेगलवाडी परिसरात अंधार असल्याने भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. प्रशासनाने केलेली विद्युत व्यवस्था पुरेशी नसल्याचे भाविकांनी सांगितले. जास्तीतजास्त भाविकांना दर्शन व्हावे, यासाठी देवस्थानच्या वतीने देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. सायंकाळी देवस्थानच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली. भाविकांसाठी गोरक्ष महाराज मठात थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
…चौकट
बसस्थानकात गाळच गाळ
त्र्यंबकेश्वर येथे प्रदक्षिणेसाठी जाणाऱ्या भाविकांकरिता राज्य परिवहन महामंडळाकडून नाशिक, पहिणे, अंबोली, इगतपुरी, घोटी यासह अन्य ठिकाणाहून २८० हून अधिक बसची व्यवस्था करण्यात आली. खासगी वाहनांना बंदी असल्याने महामंडळाच्या बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली. बसेस गर्दीने तुडुंब असल्याने अनेकांना पुढील बस येईपर्यंत वाट पहावी लागली. त्र्यंबक देवस्थानामध्ये दर्शनासाठी गर्दी राहिली. मात्र, त्र्यंबकेश्वर शहराच्या प्रवेशद्वाराजवळील बसस्थानकाचे काम सुरु असल्यामुळे येथे प्रचंड गाळ तयार झाला. त्यातून भाविकांना मार्ग काढावा लागला.
…चौकट
पाणी, फराळ, केळीचे वाटप
फेरी मार्गासह त्र्यंबकेश्वर शहरात ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत पाणी, फराळ, केळी आदी उपवासाचे साहित्य वाटप केले. त्यामुळे भाविकांना फेरी मार्गाने मार्गक्रमण करणे सोयीचे झाले. तसेच ठिकठिकाणी भगवान शंकराची प्रसिद्ध गाणी व भक्तिगीते वाजवून भाविकांचा उत्साह वाढविण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.