धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
--
कोयत्याचा धाक;
वृद्धेकडून फिर्याद
धुळे : हडसुणे (ता. धुळे) येथे जुन्या भांडणाच्या रागातून वृद्धेला कोयत्याचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुधाकर पाटील याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जानकीबाई हरी पगारे (वय ७०) यांच्या फिर्यादीनुसार २२ ऑगस्टला दुपारी एकच्या सुमारास त्या घराजवळील बाकावर बसल्या होत्या. त्यावेळी सुधाकर पाटील हा हातात कोयता घेऊन तेथे आला. पूर्वीच्या भांडणाचा गुन्हा पोलिस ठाण्यात का दाखल केला, असा जाब विचारत त्याने जानकीबाई व त्यांची सून बबीता पगारे यांना गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली. तसेच जानकीबाईंना ढकलून देत ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
-
तरुण ताब्यात;
दुचाकीही जप्त
धुळे : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) शहरातील जुना कंजरवाडा परिसरात प्राणघातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विष्णू किसन वळव (२९, रा. दोंडाईचा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चाकू, लोखंडी सळई व दुचाकी, असा ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २२ ऑगस्टला पहाटे साडेपाचच्या सुमारास विष्णू वळव हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. झडती घेतली असता त्याच्याकडे २५० रुपये किमतीचा चाकू व ५० रुपये किमतीची लोखंडी सळई मिळाली. त्याच्याकडील दुचाकीची (एमएच १७ एन ९६५६) चौकशी करण्यात आली. मात्र, त्याबाबत त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. याप्रकरणी पोलिस कर्मचारी नीलेश धनगर यांच्या फिर्यादीनुसार दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
कर्जाच्या वादातून
मारहाणीची तक्रार
धुळे : हजारखोली परिसरात कर्जाऊ हप्त्याच्या वादातून घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा प्रकार २४ ऑगस्टला घडला. मुमताज खान फिरोज खान पठाण (रा. हजार खोली, धुळे) यांच्या तक्रारीनुसार राकेश पवार व शुभम भोसले (दोघे रा. दंडेवाला बाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे) हे सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये घुसले. मुलाने एचडीएफसी कंपनीच्या वाहन कर्जाचा हप्ता न भरल्याच्या कारणावरून दोघांनी शिवीगाळ केली. मुमताज खान पठाण यांना चाकूचा धाक दाखवून चेन देण्याची धमकी दिल्यानंतर शुभम भोसले याने चेन हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. विरोध करणाऱ्या त्यांच्या पतीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
वीज तार चोरी;
दोघे ताब्यात
धुळे : नंदाणे (ता. धुळे) येथील शेतातून वीस हजार रुपये किमतीची विजेची तार चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. वीस ऑगस्टला नथ्थू डिगंबर पाटील यांच्या शेतातील विहिरीवरून तार चोरीला गेली होती. याप्रकरणी ज्ञानेश्वर किशोर सदांशिव व कल्पेश मोतीलाल पाटील (दोघे रा. वाघाडी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १० ते १२ किलो वजनाची तांब्याची तार जप्त करण्यात आली.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.