सिंहस्थासाठी तिसरा श्रावणी सोमवार ठरला ‘रंगीत तालीम’
ग्रामीण पोलिसांकडून प्रभावी व्यवस्थापन; कुशावर्तावर गर्दी नियंत्रणासह वाहनतळ, वाहतूक व्यवस्थापनावर भर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे चार ते साडेचार लाख भाविक दाखल झाले होते. पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही ‘रंगीत तालीम’ ठरली. सिंहस्थात यापेक्षा अधिक संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दी व्यवस्थापनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी कुशावर्तावरील गर्दीचे नियोजन, भाविकांचे टप्प्याटप्प्याने व्यवस्थापन, बाह्य वाहनतळ आणि वाहतूक नियोजनासह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होते. ब्रह्मगिरी फेरीसाठी रविवारी सायंकाळपासूनच भाविक त्र्यंबकमध्ये दाखल होतात. सोमवारी त्र्यंबकराजाचे दर्शन तसेच कुशावर्तावर पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी होते. यंदा चार ते साडेचार लाख भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या कडेकोट नियोजनामुळे मोठी गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मात्र, सिंहस्थात यापेक्षा कितीतरी अधिक भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारच्या गर्दीच्या अनुभवातून धडे घेत सिंहस्थासाठी आणखी प्रभावी गर्दी व्यवस्थापनाची आखणी केली जाणार आहे. विशेषतः कुशावर्त परिसरातील गर्दी नियंत्रणासह भाविकांच्या येण्या-जाण्याचे मार्ग, घाटांवरील गर्दीचे विभाजन आणि बाह्य वाहनतळापासून शहरात भाविकांना सोडण्याच्या वेळेचे नियोजन केले जाणार आहे.
बाह्य वाहनतळावरून टप्प्याटप्प्याने प्रवेश
सिंहस्थासाठी बाह्य वाहनतळांवर वाहनांच्या क्षमतेनुसार नियोजन केले जाणार आहे. शहरात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी मार्गांचे सुनियोजित नियोजन करून कुशावर्तासह अन्य घाटांवरील गर्दीचे विभाजन केले जाईल. घाटनिहाय गर्दीचे नियोजन करून संबंधित मार्गावरून भाविकांना टप्प्याटप्प्याने पाठविण्यात येईल. बाह्य वाहनतळावरूनही भाविकांना ठराविक अंतराने शहरात प्रवेश दिला जाणार आहे.
त्र्यंबकरोडमुळे वाहतूक होणार जलद
सिंहस्थापूर्वी त्र्यंबकरोडचे काम पूर्ण होऊन मार्ग वाहतुकीसाठी सज्ज करण्यावरही भर आहे. त्यामुळे भाविकांची वाहतूक अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जाईल. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने शहरातील तसेच घाटांवरील गर्दीवर निगराणी ठेवण्यात येणार आहे.
कुशावर्तावरील नियोजन
- सिंहस्थात कुशावर्तावर होणार सर्वाधिक गर्दी
- कुशावर्तावर शाही पर्वणीला ठराविक भाविकांनाच प्रवेश
- स्नानासाठी टप्प्या-टप्प्याने भाविकांच्या सोडण्याचे नियोजन
- सिंहस्थात अन्य घाटांवर भाविकांना स्नानासाठी वळविण्यात येणार
- कुशावर्तावर जाण्याचा आणि येण्याचा मार्गावरील गर्दीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन
- क्षमता वा एकावेळी गर्दी होऊ नये यासाठी ठराविक अंतरावर बॅरिकेटींग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.