सुरक्षेसाठी ग्रामपंचायत अधिकारी रस्त्यावर
जिल्हाधिकारी कार्यालयावर युनियनतर्फे मूकमोर्चा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : शिवरे ग्रामपंचायतीत (ता. पारोळा) कर्तव्यावर असताना ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १) भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. पाटील यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संशयितांवर कठोर कारवाई करावी, तसेच ग्रामपंचायतीत कर्तव्य बजावताना अधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदानापासून हा मूकमोर्चा काढण्यात आला. युनियनतर्फे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पाटील यांच्या मृत्यूमुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये संताप, असुरक्षितता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेतील संशयितांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही करण्यात आली.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ग्रामसभांची संख्या कमी करून वर्षातून केवळ एकच ग्रामसभा घेण्यात यावी. प्रत्येक ग्रामसभेवेळी शासनाकडून विनामूल्य आवश्यक पोलिस बंदोबस्त पुरवावा. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायतींची होणारी बदनामी रोखण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना कराव्यात, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षेबाबत ठोस निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभांच्या सचिवपदाचा बहिष्कार कायम ठेवतील, असा इशाराही युनियनतर्फे देण्यात आला.
ईदगाह मैदानावरून काढण्यात आलेल्या मोर्चात १ हजार २७ ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रमोद ठाकरे, सरचिटणीस संजय गिरी, राज्य मानद अध्यक्ष कैलास वाघचौरे आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तुकाराम गावित, अशोक अडसरे, किशोर खिल्लारी, विजय देवरे, शरद पाटील, ज्योती केदारे, सुवर्णा भामरे आदी उपस्थित होते.
मनोधैर्य खचले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायती राज्यपातळीवर पात्र ठरल्या आहेत. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरविण्याचे कर्तव्य ग्रामपंचायत अधिकारी इमानेइतबारे पार पाडत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात ग्रामसभांमधील आक्रस्ताळेपणा, सोशल मीडियातून महिला अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक बदनामी तसेच चुकीच्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले असून त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, अशी व्यथा निवेदनातून मांडण्यात आली.
फोटो क्रमांक :- २८४८२, ८३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.