नाशिक

कसमादेला हवे विकासाचे नवे मॉडेल

CD
(पान १/कव्हरस्टोरी ६ कॉलम करायची) - संजय फतनानी -NSK26H28535 ---------- ‘कसमादे’च्या विकासाचे नवे त्रिसूत्र --------------------------- कृषी-उद्योग-पर्यटनाचे नवे मॉडेल ‘कसमादे’ म्हटले की, डोळ्यांसमोर उभी राहते ती शेतीची समृद्ध परंपरा, मालेगावचा वस्त्रोद्योग, कष्टाळू मनुष्यबळ आणि निसर्ग-धार्मिक पर्यटनाची मोठी क्षमता. मात्र, या स्वतंत्र ताकदींचे एकमेकांशी नियोजनबद्ध ‘कनेक्शन’ घडवून त्यातून नवी आर्थिक साखळी निर्माण करण्याची वेळ आली आहे. शेतीला मूल्यवर्धनाची जोड, उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेची दिशा आणि पर्यटनातून स्थानिक रोजगारनिर्मिती असे ‘कृषी-उद्योग-पर्यटन’ हे त्रिसूत्र स्वीकारले, तर ‘कसमादे’ पुढील पंचवीस वर्षांत उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे नवे केंद्र बनू शकते. - संजय फतनानी, मालेगाव ‘कसमादे’ची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीशी जोडलेली आहे. मोसम आणि गिरणा नद्यांच्या खोऱ्यामुळे या परिसराला शेतीचा आधार मिळतो. द्राक्षे, कांदा, डाळिंब, भाजीपाला, ऊस व विविध फळपिकांचे उत्पादन या भागात होते. मात्र शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असताना त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने कच्चा माल बाजारात विकण्यापेक्षा त्याच उत्पादनावर प्रक्रिया करून अधिक मूल्य मिळविण्याची व्यवस्था उभी राहिली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चित्र बदलू शकते. द्राक्षांपासून बेदाणा, ज्यूस आणि इतर प्रक्रिया उत्पादने, कांदा व भाजीपाल्यासाठी आधुनिक साठवणूक व्यवस्था, कोल्ड स्टोरेज, पॅकहाऊस, ग्रेडिंग-सॉर्टिंग केंद्रे तसेच रेडी-टू-ईट आणि ड्राय फूड उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यासाठी कसमादेत ‘ॲग्रो अँड फूड प्रोसेसिंग हब’ उभारण्याची संकल्पना गांभीर्याने पुढे यायला हवी. यात शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, उद्योजक आणि प्रक्रिया उद्योग यांना एकत्र आणता येईल. ▪️ मालेगावच्या वस्त्रोद्योगाला नव्या पर्वाची गरज ‘कसमादे’च्या औद्योगिक अर्थव्यवस्थेत मालेगावच्या पॉवरलूम उद्योगाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. हजारो कुटुंबांच्या उपजीविकेशी जोडलेल्या या उद्योगाने शहराला स्वतंत्र औद्योगिक ओळख दिली आहे. मात्र बदलत्या जागतिक बाजारपेठेत केवळ पारंपरिक पद्धतीने कापड उत्पादन करून भविष्यातील स्पर्धेला सामोरे जाणे कठीण आहे. मालेगावच्या वस्त्रोद्योगाने आता ‘ग्रे क्लॉथ’पासून ‘गारमेंट आणि ब्रँड’पर्यंतचा प्रवास करण्याची वेळ आली आहे. यार्न, आधुनिक पॉवरलूम, टेक्स्टाईल प्रोसेसिंग, डिझाईन, गारमेंट उत्पादन, पॅकेजिंग, ब्रँडिंग, ई-कॉमर्स आणि निर्यात अशा संपूर्ण मूल्यसाखळीचा विकास मालेगावमध्ये झाला तर स्थानिक उद्योगाला मोठी झेप घेता येईल. पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली, तर मालेगावचा वस्त्रोद्योग देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेतही अधिक प्रभावीपणे उभा राहू शकतो. ▪️ स्थानिक तरुण हेच सर्वांत मोठे भांडवल ‘कसमादे’ची खरी ताकद केवळ जमीन किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती नाही, तर येथील कष्टाळू आणि उद्यमशील मनुष्यबळ आहे. मात्र बदलत्या औद्योगिक जगात पारंपरिक कौशल्याबरोबरच आधुनिक कौशल्यांची आवश्यकता आहे. टेक्स्टाईल, गारमेंट, फूड प्रोसेसिंग, मशिनरी, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक्स, डिजिटल मार्केटिंग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे प्रशिक्षण स्थानिक युवकांना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘स्कील डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्रीज’ हे मॉडेल उभारावे लागेल. उद्योगांना कोणत्या कौशल्याची गरज आहे आणि प्रशिक्षण संस्थांनी कोणते प्रशिक्षण द्यावे, याचा थेट समन्वय झाला पाहिजे. उद्दिष्ट केवळ स्थानिक युवकांना नोकरी मिळवून देणे नसून त्यांच्यातील काहींना ‘जॉब सीकर’ ऐवजी ‘जॉब क्रिएटर’ बनविणे हे असले पाहिजे. ▪️ ‘कसमादे’ इंडस्ट्रियल कॉरिडॉरची संकल्पना औद्योगिकीकरणाला वेग देण्यासाठी नियोजनबद्ध औद्योगिक वसाहती आणि सक्षम पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. एम.आय.डी.सी‌. व एम.एस. एम.ई आणि लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून ‘कसमादे’च्या औद्योगिक क्षमतेचा एकात्मिक विचार करण्याची वेळ आली आहे.‘कसमादे इंडस्ट्रिअल कॉरिडॉर’ ही संकल्पना केवळ घोषणेपुरती न राहता तिच्यावर व्यवहार्य अभ्यास होणे गरजेचे आहे. कुठे कोणते उद्योग उभारता येतील, पाणी आणि वीज उपलब्धता किती आहे, वाहतूक व्यवस्था कशी असेल, स्थानिक मनुष्यबळ किती उपलब्ध आहे, पर्यावरणीय परिणाम काय असतील आणि कोणत्या उद्योगांना प्राधान्य द्यायचे, याचे नियोजन आवश्यक आहे. अन्नप्रक्रिया, कृषिपूरक उद्योग, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, वेअरहाऊसिंग, लॉजिस्टिक्स आणि लघु-मध्यम उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास या भागाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. ▪️ कनेक्टिव्हिटीला आर्थिक ताकदीत बदलण्याची गरज रस्ते, वीज, पाणी आणि दळणवळण या औद्योगिक विकासाच्या मूलभूत गरजा आहेत. कसमादे परिसरातील वाढती कनेक्टिव्हिटी ही उद्योगांसाठी संधी आहे. समृद्धी महामार्ग, मनमाडचे रेल्वे जाळे आणि नाशिक जिल्ह्याशी असलेली जोडणी यांचा उपयोग स्थानिक उत्पादनांना मुंबई, सुरत, पुणे, इंदूर आणि देशातील अन्य बाजारपेठांपर्यंत वेगाने पोहोचविण्यासाठी करता येऊ शकतो. मात्र वाहतूक सुविधा केवळ प्रवासासाठी न राहता त्या ‘लॉजिस्टिक इकॉनॉमी’चा आधार बनल्या पाहिजेत. गोदामे, कोल्ड चेन, पॅकिंग, मालवाहतूक आणि वितरण केंद्रे उभी राहिली तर शेतमाल आणि औद्योगिक उत्पादनांच्या बाजारपेठेला नवी गती मिळेल. ▪️ पर्यटन : रोजगाराचे नवे क्षेत्र ‘कसमादे’च्या विकासात पर्यटनाकडेही गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. सप्तशृंग गड, मांगीतुंगी, विविध धार्मिक स्थळे, गिरणा डॅम, गाळणे किल्ला, सह्याद्रीच्या डोंगररांगा, धरणे, घाट, निसर्गरम्य परिसर आणि ग्रामीण जीवनशैली या सगळ्यांमध्ये पर्यटनाच्या मोठ्या शक्यता आहेत. मात्र एखादे पर्यटनस्थळ विकसित करण्यापेक्षा ‘कसमादे पर्यटन सर्किट’ विकसित करण्याचा विचार अधिक परिणामकारक ठरू शकतो. धार्मिक पर्यटनासोबत ट्रेकिंग, ॲग्रो-टुरिझम, ग्रामीण पर्यटन, निसर्ग पर्यटन, वीकेंड पर्यटन आणि स्थानिक खाद्यसंस्कृती यांना जोडता येईल. त्यातून हॉटेल, होम स्टे, वाहतूक, पर्यटन मार्गदर्शक, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळू शकते. पर्यटन म्हणजे केवळ पर्यटकांची संख्या वाढविणे नव्हे; पर्यटकांच्या खर्चाचा जास्तीत जास्त हिस्सा स्थानिक अर्थव्यवस्थेत राहणे, हे पर्यटन विकासाचे खरे उद्दिष्ट असायला हवे. ▪️ उद्योग वाढविताना पर्यावरणाचे भानही हवे औद्योगिकीकरणाचा वेग वाढविताना पर्यावरणीय संतुलन विसरून चालणार नाही. पाणी, जमीन, हवा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांच्यावर अनावश्यक ताण पडणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. भविष्यातील उद्योग हे जलकार्यक्षम, ऊर्जा कार्यक्षम, प्रदूषण नियंत्रित आणि पर्यावरणपूरक असावेत. औद्योगिक विकास आणि पर्यावरण संवर्धन यांच्यात संघर्ष न निर्माण करता दोन्हींचा समतोल साधणे हीच खरी विकासाची कसोटी ठरेल. ‘कसमादे’ला आता एखाद्या एका पिकावर, एका उद्योगावर किंवा एका क्षेत्रावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कृषी, उद्योग आणि पर्यटन या तीनही क्षेत्रांना एकमेकांशी जोडून त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेची नवी साखळी निर्माण करणे, ही ‘कसमादे’च्या भविष्यातील विकासाची दिशा ठरू शकते. ▪️ विकासाची नवी ओळख निर्माण करण्याची संधी ‘कसमादे’चा विकास हा केवळ रस्ते, इमारती किंवा सरकारी योजनांच्या संख्येवर मोजता येणार नाही. किती स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला, किती शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मूल्यवर्धन मिळाले, किती स्थानिक उद्योग जागतिक बाजारपेठेत पोहोचले आणि पर्यटनातून किती स्थानिक कुटुंबांच्या उत्पन्नात भर पडली. या निकषांवर विकास मोजला पाहिजे. ‘कसमादे’कडे जमीन आहे, पाणी आहे, शेती आहे, उद्योगाची परंपरा आहे, पर्यटनाची क्षमता आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कष्ट करण्याची तयारी असलेले मनुष्यबळ आहे. आता गरज आहे ती, या सर्व शक्तींना एका दिशेने एकत्र आणण्याची. ‘उद्योग-कृषी-पर्यटन’ हे ‘कसमादे’च्या भविष्यातील विकासाचे त्रिसूत्र ठरले, तर हा परिसर केवळ नाशिक जिल्ह्याचा एक भौगोलिक पट्टा न राहता उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू बनू शकतो. (लेखक रेडीमेड कापड व्यावसायिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : सकल मराठा समाजाकडून लातूर जिल्हा बंदची हाक; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

Maratha Reservation : पाण्याच्या टाकीवर चढून पेट्रोलची बाटली हातात घेत उपोषण; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन

Lohgaon News : संसाराची जबाबदारी सांभाळत जिद्दीने अभ्यास; धुपखेड्याच्या सुनेची नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड

Marathi News Live Updates : शिवसेना पक्षाच्या वादावर सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद नेमका काय ?

'तो फोटो चोरला अन् आईने खूप मारलं' जितेंद्र जोशी बालपणीची आठवण सांगताना म्हणाले...'मामाने पट्ट्यानं आणि आईनं चपलेनं...'

SCROLL FOR NEXT