फोटो : केशव मते 28551 ते 62
‘आरएसएस’ची पायरी कधी चढू नका!
---
संघटन सृजन शिबिरात राहुल गांधींचा जिल्हाध्यक्षांना ‘एकनिष्ठ’तेचा धडा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : काँग्रेसच्या संघटन सृजन या प्रशिक्षण शिबिरात लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना पक्षाबरोबर एकनिष्ठ कसे रहावे, याचा कानमंत्र दिला. तसेच महिलांचा सन्मान, महाराष्ट्रातील ‘एसआयआर’चे प्रश्न, ‘जेन झी’बरोबर संवाद वाढविण्याचा आणि शेती, उद्योग, आदिवासी, बेरोजगारीची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा मूलमंत्र देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) पायरी कधीही चढू नका, असा सल्लाही दिला.
खासदार राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमधील संघटन सृजन निवासी प्रशिक्षण शिबिराचा बुधवारी (ता. २) समारोप झाला. तब्बल पाच तासांचा वेळ देत त्यांनी दोन सत्रांत ७२ जिल्हाध्यक्षांशी संवाद साधला. पहिल्या सत्रात देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाष्य केले. भारत देश हा सध्या अमेरिका व चीन यांचा मध्यस्थी बनला आहे. आपल्या देशात वस्तू उत्पादनाचे प्रमाण कमी झाल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. तसेच, महिलांना सन्मान देण्यात भाजप कमी पडला आहे, हे पटवून देण्यासाठी त्यांनी पौराणिक संदर्भ दिले. भगवान शंकर, भगवान गौतम बुद्ध, साईबाबा, ऋषभ देव यांच्या भावमुद्रा आणि शिकवण ही महिलांचा सन्मान करणारी आहे. पण, भाजप भगवान ‘विष्णूं’ना मानते व महिलांना सापत्न वागणूक देते. यामुळे आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा कदापि स्वीकारणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. प्रत्येक जिल्हाध्यक्षाने पक्षाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. स्वयंभू होताना आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ द्यावा, आपण ज्या आपुलकीने कुटुंबीयांशी संवाद साधतो, त्याचप्रमाणे समाजातील मागासवर्गीय व्यक्ती, गोरगरीब, शेतकरी, मजूर, महिला यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
तीन कोटी मतदारांचा प्रश्न
मतदार पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. प्रत्यक्षात तीन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे वगळली जाऊ शकतात. कारण, बहुतेक मतदारांच्या नावात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झालेल्या आहेत. त्यांना स्वतंत्र केले असून, या दुरुस्ती प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हाध्यक्षांनी बूथ स्तरावर जाऊन मतदारांना मदत केली पाहिजे, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला.
जिल्हाध्यक्षांना मूलमंत्र
- स्वयंभू होण्यासाठी स्वत:ची कामे स्वत: करा
- शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी ‘जुजुत्सु’ मार्शल आर्टचे धडे
- तरुणांशी संवाद वाढवा, ‘एसआयआर’चे प्रश्न सोडवा
- गरीब, आदिवासी, शेतकरी, मागासवर्गीयांचे प्रश्न समजून घेण्यासाठी जनतेपर्यंत जा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.