लोगो : एसआयआर
नाशिक विभागात २४ लाख ५३ हजार मतदार वगळले
स्थलांतरितांचे प्रमाण सर्वाधिक; ‘एसआयआर’च्या प्रारूप यादीत एक कोटी ३१ लाख ९७ हजार मतदार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमधून तब्बल २४ लाख ५३ हजार ३६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये मृत आणि स्थलांतरित मतदारांची संख्या अधिक असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयातर्फे देण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या पाचही जिल्ह्यांत ‘एसआयआर’चा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. या टप्प्यात महसूल प्रशासनाने बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्या सहाय्याने पाचही जिल्ह्यांतील एक कोटी ५६ लाख ५० हजार ४५८ मतदारांची पडताळणी केली.
बीएलओंनी घरोघरी भेटी देऊन संबंधित मतदारांची माहिती संकलित केली. त्यांच्याकडून गणना पत्रकेही भरून घेण्यात आली. मात्र, या मोहिमेदरम्यान तब्बल २४ लाख ५३ हजार ३६ मतदारांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक नऊ लाख १८ हजार ६५७ मतदार स्थलांतरित असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय सात लाख दोन हजार ७६० मतदारांशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकलेला नाही. मृत मतदारांची संख्या पाच लाख आठ हजार ३८० असून, दुबार मतदारांची संख्या तीन लाख १४ हजार ४१ आहे. तसेच नऊ हजार १९८ मतदारांनी आवश्यक माहिती देण्यास प्रतिसाद दिला नसल्याची माहितीही प्रशासनाने दिली.
एक कोटी ३१ लाख मतदार
‘एसआयआर’ मोहिमेच्या प्रारंभी नाशिक विभागात एकूण एक कोटी ५६ लाख ५० हजार ४५८ मतदार होते. ‘एसआयआर’च्या पहिल्या टप्प्यात २४ लाख ५३ हजार ३६ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत आता एक कोटी ३१ लाख ९७ हजार ४२२ मतदार आहेत. अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी ४ नोव्हेंबरला होणार असून, त्यानंतर नाशिक विभागातील मतदारांची अंतिम संख्या स्पष्ट होणार आहे.
---
विभागातील स्थिती
जिल्हा...........एसआयआरपूर्वी मतदार...........प्रारूप यादीनुसार मतदार...........वगळलेले मतदार
नाशिक...........५१०४४५८...........४०७६६६६...........१०२७७९२
धुळे...........१८३५१२५...........१५४०२६८...........२९४८५७
जळगाव...........३५५२१९९...........३०३७४५६...........५१४७४३
नंदुरबार...........१३४८५७४...........११५९८४५...........१८८७२९
नगर...........३८१०१०२...........३३८३१८७...........४२६९१५
एकूण...........१५६५०४५८...........१३१९७४२२...........२४५३०३६
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.