पान एक मेन
---------------------
सिंहस्थ कामांबाबत डेडलाइन..!
एप्रिलनंतर अपूर्ण कामांचा निधीभार संबंधित विभागांवर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : पुढीलवर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहर व जिल्ह्यात विकास कामे सुरु असताना कामांना होणारा विलंब लक्षात घेता आता वेळ निश्चितीचे धोरण स्वीकारले जाणार आहे. एप्रिल २०२७ पर्यंत सर्व कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर जेवढे काम पूर्ण झाले त्याव्यतिरिक्त उरलेल्या कामांचा निधीचा भार संबंधित विभागावर टाकला जाणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे कामे पूर्ण करण्याबरोबरच गुणवत्ता हा निकष पाळण्याचे मोठे आव्हान सर्वच शासकीय विभागांसमोर निर्माण झाले आहे.
कुंभमेळ्यासाठी प्रयागराजच्या धर्तीवर शहर व जिल्ह्यात कामे सुरु आहेत. प्रयागराजच्या दहापट भाविक नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येतील असा अंदाज वर्तविला जात आहे. त्याअनुशंगाने शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. गर्दीचा अंदाज तीन श्रावणी सोमवारच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील गर्दीतून दिसून आल्याने त्यादृष्टीने कुंभमेळा प्राधिकरणाचे नियोजन सुरु आहे. नाशिक शहरात २८ रस्त्यांची कामे सुरु आहेत, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी स्वच्छ व अविरत वाहण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प बांधणीचे काम सुरु आहे. शहरात सीसीटीव्ही बसविणे, त्र्यंबक-पहिने-घोटी मार्गाचे चौपदरीकरण, नाशिक-त्र्यंबक रस्ता विस्तारीकरण, द्वारका सर्कल येथे भुयारीमार्ग तयार करणे, परिक्रमा मार्ग, त्र्यंबकेश्वर व नाशिक मध्ये गोदावरी नदीवर घाट बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
-------------
चौकट
त्र्यंबकेश्वरमध्ये ३५० कामे
त्र्यंबकेश्वर येथे पेयजल योजना, तपोवनात साधुग्राम उभारणी, पर्यटन विभागामार्फत तीर्थक्षेत्र विकास, ओझर विमानतळ टर्मिनल विस्तारीकरण, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, ओढा, कसबे-सुकेणे रेल्वे स्थानक नुतनीकरण, रामकाल पथ, त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथ अशी जवळपास ३५० विकासाची कामे सुरु आहेत. प्रत्येक कामासाठी वेळेची निश्चिती करण्यात आली आहे. परंतु, काही विभागांकडून निधी न मिळणे, निविदा प्रक्रियेतील घोळ, तांत्रिक कारणांमुळे कामांना विलंब होत आहे. सिंहस्थ प्राधिकरणासह महापालिकेकडून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्याच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालय पातळीपासून विविध समित्या कार्यरत आहे. या समित्यांकडून कामांचा वांरवार आढावा घेतला जात आहे. परंतु, बहुतांश कामांच्या बाबतीत कंत्राटदारांकडून विविध कारणे देवून मुदतवाढ मागण्याची तयारी असल्याने त्यापार्श्वभूमीवर आता सर्वच कामांना वेळेचे बंधन निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी एप्रिल २०२७ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
---------------
अन्यथा विभागांवर आर्थिक भार
नाशिक-त्र्यंबकेश्वर सह राज्यातील तीर्थ स्थळांवर जवळपास ३५० कामे सुरु आहेत. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अंतिम डेडलाइन देण्यात आली आहे. ती एप्रिल २०२७ अशी आहे. त्यानंतर ज्याविभागांचे जेवढे काम शिल्लक राहिले असेल त्या कामांचा निधी किंवा संबंधित कंत्राटदारांची देयके त्या-त्या विभागांना द्यावी लागणार आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित विभागांवर अपूर्ण कामांचा आर्थिक भार पडणार असल्याचे त्यातून स्पष्ट होते.
----------------
कामांची गुणवत्ता राखली जाणार
एकीकडे कामांसाठी एप्रिल २०२७ हा कालावधी निश्चित करताना घाईत कामे आटोपली जावू नये यासाठी गुणवत्तेवर देखील लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे देयके मंजूर करताना गुणवत्ता हा निकष महत्त्वाचा ठरणार असल्याने विविध विभागांकडून सुरु असलेल्या कामांची गुणवत्ता तपासण्याचे मोठे आव्हान विभागांसमोर राहणार आहे.
-------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.