धुळे ः टुडे १ साठी, सेकंडमेन
--
महावितरण कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला
-
बाळापूर शिवार : वीजबिलप्रश्नी आठ जणांवर चौदा कलमांन्वये गुन्हा
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या येथील पथकावर थकबाकीदारांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना धुळे तालुक्यातील बाळापूर शिवारात बुधवारी (ता. २) सायंकाळी घडली. जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवत असताना मालक व त्यांच्या हस्तकांनी एका तंत्रज्ञावर दांडक्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रात्री उशिरा आठ जणांविरोधात विविध चौदा गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
-
महावितरणतर्फे सध्या थकबाकी वसुली मोहीम सुरू आहे. ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ बिल न भरलेल्या आणि पाच हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची यादी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यानुसार धुळे- फागणे उपविभागाचे सहायक अभियंता प्रवीण भामरे, आशिष कासार, रविंद्र चौधरी, चंद्रकांत पाटील, इंद्रजित नाईक, रूपेश पाटील तसेच स्मार्ट मीटर कंपनीचे प्रतिनिधी अभिषेक पाटील व विनय ठाकूर हे पथक बाळापूर शिवारातील साईसागर ग्रॅनाइट मार्बल दुकानावर गेले. या ग्राहकांकडे साडेसहा हजारांहून अधिक थकबाकी होती.
-
वीजपुरवठा खंडीत
पथकाने वीजबिल भरण्याची सूचना केल्यावर दुकानात उपस्थित योगेश नामक व्यक्तीने मालक बाहेर असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावर सहायक अभियंता भामरे यांनी नियमानुसार जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू केली. तंत्रज्ञ चंद्रकांत पाटील यांनी खांबावर चढून वीजपुरवठा खंडित केला. दरम्यान, दुकानाचे मालक सागर पाटील, आकाश पाटील व ज्ञानेश्वर पाटील हे गाडीने तेथे आले आणि ‘लाईन कोणी बंद केली रे,’ असे विचारत वाद घातले. योगेश व अन्य एकाने चंद्रकांत पाटील यांच्याकडे बोट दाखवून सप्लाय बंद केल्याचे सांगितले. यावर सागर पाटील यांनी ‘घ्या रे यांना साईडला,’ अशी चिथावणी दिली. योगेश, बॉबी नामक संशयित आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींनी चंद्रकांत पाटील यांना अर्वाच्य शिवीगाळ करत धक्काबुक्की व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
-
कर्मचारी जखमी
या दरम्यान लांब बाह्याचा टी-शर्ट घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीने दुकानावरील लाकडी दांडका उचलून ठार मारण्याच्या उद्देशाने चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर वार केला. पाटील यांनी तो वार हुकवून घेतल्याने तो उजव्या खांद्यावर बसला. या हल्ल्यात पाटील जमिनीवर कोसळले. वसुली पथकाने त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले. तपासणीत त्यांच्या उजव्या खांद्यावर फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले.
-
१४-१
...चौकट...
१४-१
अधिकाऱ्यांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
घटनेनंतर संबंधितांकडून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माघार घेतली नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांसह सात अभियंते व आठ तांत्रिक कर्मचारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात तब्बल पाच तास ठाण मांडून बसले होते. अखेर रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. सहायक अभियंता प्रवीण भामरे यांच्या फिर्यादीनुसार विविध कलमान्वये सागर पाटील, आकाश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, योगेश, बॉबी व तीन अनोळखी व्यक्ती, अशा एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.