मतदार नोटिसांना संकेतस्थळाचा अडथळा
एसआयआर : प्रशासनाला प्रतीक्षा; नागरिकांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : मतदारयादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत (एसआयआर) दुसऱ्या टप्प्यात प्रारूप यादीमधील संदिग्ध माहिती असलेल्या मतदारांना नोटीस बजावल्या जाणार आहेत. जिल्ह्यात सात लाख ३४ हजार ६८५ मतदारांना या नोटीस बजावण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र प्रारूप यादी प्रसिद्धीस पाच दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही निवडणूक आयोगाने संकेतस्थळ सुरू न केल्याने नोटिसांच्या छपाईची प्रक्रिया ठप्प पडली आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये एसआयआर मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. या टप्प्यात प्रारूप मतदार याद्यांची ३१ ऑगस्टला प्रसिद्धी झाल्यानंतर यापुढील प्रक्रियेत मतदारांना नोटीस बजावून रीतसर सुनावण्या घ्यायच्या आहेत. त्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार नोटिसांची छपाई करायची आहे. जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघातून सात लाख ३४ हजार ६८५ मतदारांना या नोटीस वितरित करण्यात येणार आहेत. मात्र, पाच दिवसांपासून आयागाने सदर संकेतस्थळ बंद ठेवले आहे. त्यामुळे नोटिसांची छपाई कधी करायची आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येच्या मतदारांपर्यंत त्या कधी पोहचवायच्या, अशा प्रश्न जिल्हा प्रशासनाला भेडसावतो आहे.
मतदारांसाठी संधी
मतदार यादीतील नाव, पत्ता, रहिवास पुराव्यातील त्रुटी, तसेच २००२ च्या यादीतील नाव अथवा पालकांच्या नावांचा पुरावा सादर न करणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावण्यात येतील. ही नोटीस म्हणजे केवळ अधिकची एक पडताळणी आहे. या माध्यमातून मतदारांना त्यांची नावे यादीत अंतिम करण्याची ही संधी आहे. त्यामुळे नागरिकांनी नोटिसीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघत दिलेल्या तारखेला व वेळेवर सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सुनावणीसाठी जागांची निश्चिती
जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील सुनावणीसाठी जिल्हा प्रशासनाने ३४५ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे अधिकारी त्या-त्या मतदारसंघात विविध ठिकाणी सुनावणीची प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी जागांची निश्चिती करण्यात आली आहे. नागरिकांना नोटीसवर सुनावणीचे ठिकाण दर्शविण्यात आले आहे. सुनावणीस येताना आयोगाने ठरवून दिलेल्या १२ पुराव्यांमधील कागदपत्रे सोबत ठेवावी, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
मतदारसंघनिहाय नोटीस
मतदारसंघ..............संख्या
नांदगाव..............४०,८३८
मालेगाव मध्य..............४७,०५२
मालेगाव बाह्य..............६२,९९९
बागलाण..............२५,५०२
कळवण..............४५,४७४
चांदवड..............३८,६६०
येवला..............३३,९१६
सिन्नर..............३७,३८५
निफाड..............३३,२०२
दिंडोरी..............४३,९३९
नाशिक पूर्व..............७१,९०६
नाशिक मध्य..............६१,४२६
नाशिक पश्चिम..............९२,२३७
देवळाली..............६४,५२२
इगतपुरी..............३५,६२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.