सीटीबी
---
दहा बाय दहाच्या खोलीपासून अत्याधुनिक ‘रत्ना हेल्थकेअर’पर्यंत...
ज्ञान आणि कौशल्याच्या ध्यासातून घडले यशाचे प्रेरणादायी पर्व
---
लीड
मुंबईतील दहा बाय दहा फुटांच्या छोट्याशा खोलीत राहून अत्याधुनिक वैद्यकीय कौशल्य आत्मसात करण्यासाठी धडपडणारा एक तरुण डॉक्टर, वडिलांच्या पेन्शनमधून मिळणाऱ्या मदतीवर शक्य तितका कमी आर्थिक भार पडावा म्हणून स्वतःच्या गरजा कमी करणारा विद्यार्थी आणि आज अत्याधुनिक निदान सुविधांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना सेवा देणाऱ्या ‘रत्ना हेल्थकेअर’चा संचालक...
ही प्रेरणादायी यशोगाथा आहे डॉ. प्रशांत तानाजी मुसळे यांची.
---
नाशिकमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या डॉ. मुसळे यांना बालपणापासूनच शिस्त, प्रामाणिकपणा, कष्ट आणि शिक्षणाचे महत्त्व यांचे संस्कार मिळाले. त्यांचे वडील महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात कार्यरत होते आणि नंतर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सचिव म्हणून निवृत्त झाले. आई गृहिणी होती. उपलब्ध साधनसामग्रीत समाधान मानून, स्वतःच्या मेहनतीच्या बळावर पुढे जाण्याची शिकवण त्यांना घरातूनच मिळाली. त्यांचे शालेय शिक्षण फ्रवशी ॲकॅडमीत झाले. त्यानंतर ‘केटीएचएम’मध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. २००५ ते २०११ या कालावधीत ‘एनडीएमव्हीपीएस’ वैद्यकीय महाविद्यालय, आडगाव येथून वैद्यकीय पदवी आणि प्रशिक्षणकालीन वैद्यकीय सेवा पूर्ण केली. त्यानंतर २०११ ते २०१४ या कालावधीत देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर येथून किरणनिदानशास्त्रातील पदव्युत्तर पदवी संपादन केली. वैद्यकीय शिक्षणाने त्यांना केवळ पदवी दिली नाही, तर निरीक्षण क्षमता, अचूकता, शिस्त, सातत्य आणि रुग्णाप्रति असलेली जबाबदारी यांची खरी जाणीव करून दिली. मात्र पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांचा शिकण्याचा प्रवास थांबला नाही. उलट, प्रत्यक्ष कामातील आधुनिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांनी मुंबईचा रस्ता धरला.
---
यशाची खरी पायाभरणी
मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयात काम केल्यानंतर त्यांनी हस्तक्षेपात्मक किरणनिदानशास्त्र या क्षेत्रात अधिक सखोल प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. या काळात डॉ. विमल सोमेश्वर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. जवळपास वर्षभर डॉ. सोमेश्वर स्वतःच्या गाडीतून त्यांना मुंबईतील नामांकित रुग्णालयांमध्ये घेऊन जात आणि प्रत्यक्ष कामातून आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य शिकवत. या काळात मिळणारे मानधन फारसे नव्हते. ते दैनंदिन खर्चापुरतेच होते. पण डॉ. मुसळे यांचे ध्येय त्या वेळी पैसा कमविणे नव्हते. त्यांना ज्ञान आणि कौशल्य कमवायचे होते. मुंबईसारख्या महागड्या शहरात दहा बाय दहा फुटांच्या छोट्याशा खोलीत राहून त्यांनी काटकसरीचे जीवन स्वीकारले. वडील निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पेन्शनमधून मदत करत होते. त्यामुळे त्यांच्यावर अधिक आर्थिक भार पडू नये म्हणून प्रत्येक खर्च जपून केला. प्रसंगी स्वतःच्या गरजांवर मर्यादा आणल्या. मात्र ज्ञान आणि अनुभव मिळविण्याच्या ध्यासात कोणतीही तडजोड केली नाही. हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा ठरला. कारण, पुढे त्यांनी उभारलेल्या यशाची खरी पायाभरणी याच काळात झाली होती.
---
कारकिर्दीतील मोठा टप्पा
२०१५ मध्ये आर्थिक परिस्थितीचा विचार करून ते नाशिकला परतले आणि एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाले. आपल्या कामातील प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि समर्पणामुळे त्यांनी अल्पावधीतच सर्वांचे लक्ष वेधले. रुजू झाल्यानंतर अवघ्या दीड वर्षात त्यांच्यावर किरणनिदान विभागप्रमुख ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली. हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा होता. इगतपुरी परिसरातील ग्रामीण भागात काम करताना त्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवेची गरज जवळून अनुभवता आली. त्यांचे मूळ गाव नांदगाव बुद्रुक असल्याने त्या परिसरातील नागरिकांशी त्यांचे विशेष नाते निर्माण झाले. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी केलेला सत्कार हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. मात्र स्वतःचे निदान केंद्र सुरू करण्याचे स्वप्न त्यांच्या मनात सतत होते. मोठे भांडवल नव्हते. स्वतःची जागा नव्हती. मात्र स्वतःच्या ज्ञानावर आणि व्यावसायिक क्षमतेवर विश्वास होता. २०१८ मध्ये त्यांनी दोन बँकांकडून कोणतेही तारण न देता सुमारे २० लाखांचे व्यवसाय कर्ज घेतले. एका मित्राने या प्रक्रियेत मोलाची मदत केली आणि अखेर १० मार्च २०१८ मध्ये भाड्याच्या जागेत, केवळ सोनोग्राफी सेवेपासून ‘रत्ना हेल्थकेअर’चा जन्म झाला. सुरुवात छोटी होती; पण ध्येय मोठे होते. अधिकाधिक सुविधा उभारण्यापेक्षा सुरुवातीला दर्जेदार निदान, अचूक अहवाल आणि डॉक्टर व रुग्णांचा विश्वास संपादन करण्यावर त्यांनी भर दिला.
---
‘रत्ना हेल्थकेअर’ची दमदार वाटचाल
आज आठ वर्षांच्या प्रवासात ‘रत्ना हेल्थकेअर’ने सोनोग्राफीच्या पलीकडे विस्तार करत सीटी स्कॅन, डिजिटल क्ष-किरण तपासणी, डिजिटल रेडिओग्राफी प्रणाली आणि रुग्णशय्येजवळ करता येणारी क्ष-किरण तपासणी यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे, सीटी स्कॅन सेवा २४ तास उपलब्ध ठेवून आपत्कालीन परिस्थितीतही निदानासाठी तत्पर राहण्याचा प्रयत्न केला जात आहे. डॉ. मुसळे यांच्या मते, किरणनिदानशास्त्र हे अत्यंत वेगाने बदलणारे आणि तंत्रज्ञानाधिष्ठित क्षेत्र आहे. त्यामुळे नवीन यंत्रसामग्री घेणे म्हणजे केवळ व्यवसायाचा विस्तार नव्हे, तर अधिक वेगवान, अचूक आणि दर्जेदार निदानासाठी केलेली गुंतवणूक आहे. त्यामुळे रत्ना हेल्थकेअरच्या वाटचालीत तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि कार्यप्रणाली यांचे सातत्याने अद्ययावतीकरण करण्यात आले. ‘आज जे चांगले आहे, ते उद्यासाठी पुरेसे असेलच असे नाही,’ हा विचार त्यांच्या कामाच्या केंद्रस्थानी आहे.
---
विविध स्तरांवर दखल
डॉ. मुसळे यांच्या कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. ‘सकाळ एक्सलन्स ॲवॉर्ड- २०१९- आउटस्टॅडिंग एक्सलन्स इन रेडिओलॉजी, इॅम्पक्ट मेकर्स- ब्रँड रिकीनायजेशन दुबई- २०२४ या पुरस्कारांसह त्यांनी विविध माध्यमांनी दिलेल्या पुरस्कारांनीही त्यांच्या यशस्वी प्रवासात मानाचे अध्याय जोडले आहेत. मात्र डॉ. मुसळे यांच्यासाठी सर्वांत मोठा पुरस्कार कोणता, तर ‘रत्ना हेल्थकेअर’वर वर्षानुवर्षे विश्वास ठेवणारे रुग्ण आणि वैद्यकीय सहकारी. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, कठीण काळात वडिलांनी केलेली मदत आणि डॉ. विमल सोमेश्वर यांचे निःस्वार्थ मार्गदर्शन यांचे विशेष योगदान आहे. कुटुंब, मित्र, सहकारी, कर्मचारी आणि रुग्णांचा विश्वास, हेही त्यांच्या प्रवासातील महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.
दहा बाय दहा फुटांच्या खोलीत राहून कौशल्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका तरुण डॉक्टरपासून आधुनिक निदान केंद्र उभारणाऱ्या यशस्वी उद्योजकापर्यंतचा हा प्रवास केवळ व्यावसायिक यशाचा नाही, तर तो आहे शिकण्याच्या भुकेचा, योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाचा, आई-वडिलांच्या संस्कारांचा, प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानण्याचा आणि पैशापेक्षा ज्ञान व कौशल्याला प्राधान्य देण्याचा प्रवास. आज ‘रत्ना हेल्थकेअर’ ही केवळ एक आरोग्यसेवा संस्था नाही, तर सातत्याने शिकत राहण्याच्या वृत्तीची, गुणवत्तेवर आधारित प्रगतीची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याची एक प्रेरणादायी कहाणी आहे.
---
‘रत्ना हेल्थकेअर’ची वाटचाल
- १० मार्च २०१८ : केवळ सोनोग्राफी सेवेपासून सुरुवात
आजच्या सुविधा : सोनोग्राफी, सीटी स्कॅन, डिजिटल क्ष-किरण तपासणी, डिजिटल रेडिओग्राफी प्रणाली आणि रुग्णशय्येजवळ करता येणारी क्ष-किरण तपासणी.
- विशेष सेवा : २४ तास सीटी स्कॅन सुविधा
---
कोट
सुरुवातीला पैशांमागे धावण्यापेक्षा ज्ञान, कौशल्य आणि अनुभवामागे धावा. योग्य गुरू शोधा आणि त्यांच्याकडून शक्य तितके शिका. तंत्रज्ञान बदलत असते, त्यामुळे स्वतःलाही सतत बदलत आणि शिकत राहावे लागते. वैद्यकीय पदवी तुम्हाला डॉक्टर बनवते; पण सातत्याने शिकण्याची वृत्ती आणि रुग्णाचा विश्वास तुम्हाला उत्कृष्ट डॉक्टर बनवतो. कौशल्य आणि हेतू प्रामाणिक असतील, तर यश तुमच्या मागे येते.
- डॉ. प्रशांत तानाजी मुसळे
---
डॉ. प्रशांत तानाजी मुसळे,
किरणनिदानतज्ज्ञ व संचालक
संस्था : रत्ना हेल्थकेअर, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.