(पान ९ ला मेन)
फोटो : NSK26H28789
प्रकाशा : ‘आरएसव्हीसी’ सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित अविनाश तिवारी, मनोज चौधरी, दीपक बारहाते, नंदकुमार पैठणकर, डॉ. राजेंद्र दहातोंडे, दीपक पटेल, राजनंदनी भिल्ल, प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल आदी.
----------------------
‘आरएसव्हीसी’मुळे शेती व्यवसायातील अडचणी दूर होणार
डॉ. ए. के. सुद : नाबार्डच्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘रुटागे स्मार्ट व्हिलेज सेंटर’चे प्रकाशात उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ४ : प्रमाणित वैज्ञानिक उपाय थेट ग्रामीण समुदाय आणि स्थानिक उद्योजकांशी जोडून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हे ‘आरएसव्हीसी’ मॉडेलचे खरे यश राहणार आहे. नाबार्डने सुरू केलेले महाराष्ट्रातील हे पहिले सेंटर असून, ग्रामीण भागातील तंत्रज्ञानाची दरी मिटवण्यासाठी उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी या केंद्रामुळे उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन नाबार्डचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. के. सूद यांनी केले.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) ‘रुटागे स्मार्ट व्हिलेज सेंटर’चे (आरएसव्हीसी) उद्घाटन शुक्रवारी (ता. ४) प्रकाशा (ता. शहादा) येथे नाबार्डचे डॉ. सूद यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. कार्यक्रमास नाबार्डच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. भवानी शंकर, नाबार्ड प्रधान कार्यालयाचे बी. आर. प्रेमी आणि भारत सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या स्ट्रॅटेजिक अलायन्स संचालक डॉ. सपना पोती, बायफचे अध्यक्ष भरत काकडे आदी आभासी पद्धतीने विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक अविनाश तिवारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक बारहाते, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र दहातोंडे, आत्माचे प्रकल्प संचालक दीपक पटेल, प्रकाशा सरपंच राजनंदनी भिल्ल, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
काही स्थानिक शेतकऱ्यांनी थेट डॉ. ए. के. सूद यांच्याशी संवाद साधला. दैनंदिन शेतीमधील अडचणी दूर करण्यासाठी हे केंद्र कशा पध्दतीने काम करू शकते. लहान शेतकऱ्यांपर्यंत शाश्वत उपजीविकेचे पर्याय थेट पोहोचवण्यासाठी संस्थात्मक भागीदारी यावर चर्चा झाली. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक रवींद्र पी. मोरे आणि बायफचे व्यवस्थापक देवेंद्र पाटील यांनी केंद्रातील विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती दिली. स्थानिक शेतकरी समुदायासाठी त्याचा कसा वापर होऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. केंद्राच्या माध्यमातून आधुनिक व उच्च प्रतीच्या तंत्रज्ञानाची कृषी उत्पन्नासाठी व गुणवत्तापूर्व शेतीसाठी मदत होईल. शेती उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढीस मदत मिळेल. यातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक रवींद्र मोरे यांनी केले. कार्यक्रमास शेतकऱ्यांसह दहा गावांतील प्राथमिक कृषी पतसंस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक रवींद्र मोरे, बायफचे व्यवस्थापक देवेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.
------
नंदुरबार जिल्हा ‘स्मॉर्ट कृषी मॉडेल’ बनेल
रुटागे स्मार्ट व्हिलेज सेंटरद्वारे तांत्रिक कौशल्ये, संस्थात्मक कर्ज पुरवठा आणि वैज्ञानिक शेती पद्धतींचा मेळ साधल्यामुळे स्थानिक शेतकरी आणि महिला बचतगटांना मोठा फायदा होईल. नंदुरबार जिल्ह्याला स्मार्ट कृषी उपायांचे केंद्र बनवण्यासाठी, गावपातळीवरील संस्थांना सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण समुदायांचे भविष्य स्वावलंबी करण्यासाठी प्रकाशातील हे केंद्र एक आदर्श सहकार्यात्मक मॉडेल ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.