टुडे पान ३ : मेन फिचर
(महापालिका इमारत वापरावी)
---
अतिक्रमण निर्मूलनासाठी ‘टास्क फोर्स’ सज्ज
पथकात १५ सदस्य; स्वतंत्र वाहनांसह पोलिसांचीही मदत, जागेवरच होणार निर्णय
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी जळगाव महापालिकेने आता अतिक्रमण निर्मूलनासाठी स्वतंत्र ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमणाशी संबंधित विविध विभागांची एकत्रित यंत्रणा या पथकात असणार असून, त्यामुळे पक्के बांधकाम, तत्काळ हटविता येणारे अतिक्रमण तसेच रस्ते व्यापून बसलेल्या हॉकर्सवर अधिक वेगाने आणि प्रभावीपणे कारवाई करणे शक्य होणार आहे. या पथकासाठी स्वतंत्र वाहनेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
महापालिका आयुक्त आदित्य जीवने हे टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील, तर उपायुक्त पंकज गोसावी यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी राहणार आहे. नगररचना विभागाचे अभियंता अतुल पाटील, बांधकाम विभागाचे विशाल सुर्वे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी आणि संबंधित विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश करून सुमारे १५ सदस्यांचे हे पथक तयार करण्यात येणार आहे.
कारवाईला येणार गती
सध्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ शहराच्या व्याप्तीच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यामुळे एका भागात कारवाई सुरू असताना दुसऱ्या भागातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. शिवाय कारवाईसाठी मर्यादित वाहने उपलब्ध असल्यानेही अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर विविध विभागांतील अधिकारी एकाच छताखाली आणून निर्णय प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न टास्क फोर्सच्या माध्यमातून केला जाणार आहे.
समन्वयातून कारवाई होणार
शहरातील एखाद्या ठिकाणी अतिक्रमणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे स्वरूप नेमके काय आहे, बांधकाम अनधिकृत आहे का, ते तातडीने हटविता येण्यासारखे आहे का किंवा संबंधित जागेवर इतर विभागाची परवानगी आवश्यक आहे का, याबाबत संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेतील. त्यामुळे अतिक्रमणाची फाइल एका विभागातून दुसऱ्या विभागाकडे फिरण्याऐवजी जागेवरच समन्वयातून पुढील कारवाईचा निर्णय घेता येणार आहे.
रस्त्यांची पाहणी केली जाणार
प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी हॉकर्स तसेच इतर अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्यास या पथकाला प्राधान्य राहणार आहे. पक्क्या अनधिकृत बांधकामांबाबतही नगररचना व बांधकाम विभागाच्या तांत्रिक पाहणीनंतर पुढील कारवाईचा मार्ग निश्चित केला जाणार आहे.
पोलिस ही असणार सोबत
अतिक्रमण कारवाईसाठी गरज भासल्यास पोलिस प्रशासनाची मदतही घेतली जाणार असून, टास्क फोर्समध्ये उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कारवाईदरम्यान निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासही मदत होणार आहे.
कोट
या टाक्स फोर्सची स्थापना सर्वोच्च न्यायलयात तसेच शासनाच्या जीआरच्या यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार तयार करण्यात आली असून यामुळे शहराला एक चांगली शिस्त तसेच रस्ते मोकळे करण्यासाठी टास्क फोर्सच्या माध्यमातून जलद निर्णय घेऊन कारवाई यातून केली जाणार आहे.
- आदित्य जिवने, आयुक्त, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.