चोरीच्या दुचाकी विक्रीचा डाव उधळला
--
दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली. आरटीओच्या वाहन तपासणीत ती दुचाकी शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
गुरुवारी (ता. ३) दुपारी साडेबाराला कांताई नाट्यगृह परिसरात दोघे चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता, दोघे विनाक्रमांकाची दुचाकी घेऊन संशयास्पद फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबवून वाहनाची कागदपत्रे व मालकी हक्काबाबत विचारणा केली. मात्र, त्यांना समाधानकारक माहिती देता आली नाही. चौकशीत त्यांनी मनोज दत्तू चौधरी (वय २४, रा. ज्ञानदेवनगर परिसर, जुना खेडी रोड) आणि सुमित शंकर चौधरी (३१, श्रीराम चौक, हरिओमनगर), अशी नावे सांगितली.
आरटीओ तपासणीत चोरी उघड
पोलिसांनी दुचाकीच्या चेसीस व इंजिन क्रमांकाच्या आधारे आरटीओ ॲपवरून तपासणी केली. त्यावेळी दुचाकीचा एमएच १९, डीवाय ७४५८ असा क्रमांक असल्याचे समोर आले. वाहनमालकाशी संपर्क साधल्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. शनिपेठ पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.दोन्ही संशयितांसह चोरीची दुचाकी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. ही कारवाई हवालदार किरण वानवडे आणि पोलिस कर्मचारी प्रवीण जाधव यांनी केली.
संशयास्पद वाहन खरेदी टाळा
नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून कमी किमतीत किंवा संशयास्पद पद्धतीने वाहने खरेदी करण्यापूर्वी वाहनाची कागदपत्रे, नोंदणी क्रमांक, चेसीस क्रमांक आणि मालकी हक्काची खात्री करावी. चोरीच्या वाहनांच्या खरेदी-विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.