NSK26H28807
नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, माजी आमदार जे. पी. गावित, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांतधिकारी अर्पिता ठुबे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत सोडताना युवक.
आदिवासींचे अन्नत्याग मागे, आंदोलन कायम
जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांची यशस्वी मध्यस्थी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : आदिवासी वसतिगृहातील असुविधांच्या विरोधात १३ दिवसांपासून सुरू असलेले ‘अन्नत्याग’ उपोषण स्थगित केले. मात्र, धरणे आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार या आंदोलकांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिकच्या प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, माजी आमदार जे. पी. गावित यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबूपाणी सेवन करत उपोषण मागे घेतले.
आदिवासी वसतिगृहातील असुविधा, सेंट्रल किचन रद्द करणे, डोनेशनच्या नावाखाली आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट आणि दोन वर्षांत वसतिगृहातील ५९३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यासाठी या विभागाचे मंत्री प्रा. अशोक उईके यांचा राजीनामा घ्यावा. तसेच या विभागाचे सचिव विजय वाघमारे व आयुक्त लीना बनसोड यांना तातडीने हटवावे, या मागणीसाठी राहुल पावरा, लक्ष्मी जाधव आणि विवेक गावित या तिघांचे बेमुदत उपोषण, तर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन मागे घेण्यासाठी आदिवासी आयुक्तायालयाकडून प्रयत्न झाले. मात्र, ते निष्फळ ठरले. याउलट आंदोलनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत गेला. यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला. यापाठोपाठ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घ्या, महाविकास आघाडीची ताकद आंदोलनामागे उभे करून देशातील सर्वांत मोठे आदिवासींचे आंदोलन उभारण्याची घोषणा केली होती. यातच ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी ही आंदोलनाला पाठिंबा देत, उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेऊन आंदोलन अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले. शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी सातच्या सुमारास अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी राहुल पावरा, विवेक गावित, लक्ष्मी जाधव यांना लहान मुलांच्या हातून लिंबूपाणी घेत आंदोलन मागे घेतले.
आमच्या विनंतीला मान देऊन युवकांनी अन्नत्याग उपोषण मागे घेतले. पण त्यांनी धरणे आंदोलन कायम ठेवले आहे. त्यांच्या मागण्या आम्ही शासनाकडे तातडीने पाठवून धोरणात्मक बाबींवर काय उपाययोजना करता येईल, याविषयी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. पुन्हा या आंदोलकांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी (नाशिक)
आंदोलकांची भूमिका समजवून घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. या सकारात्मक संवादातून युवकांनी आमच्या म्हणण्याला होकार देत आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक
उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले असले तरी आम्ही मागण्यांवर ठाम असून, आमचे धरणे आंदोलन कायम असणार आहे. आदिवासी विकासमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत उलगुलान महामोर्चा काढण्यात येईल. याची लवकरच घोषणा केली जाईल.
- प्रशांत गावंडे, आंदोलनकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.