मेन फिचर पान ३
NSK26H28834
जळगाव : भूमिगत गटारींच्या पिंप्राळा हुडको येथे सुरू असलेल्या वाहिनीच्या कामाची नकाशातून माहिती घेताना आयुक्त आदित्य जिवने. सोबत शहर अभियंता योगेश बोरोले, अभियंता योगेश वाणी आदी.
--
NSK26H28835
भूमिगत गटारीसाठी वापरले जाणारे पाइप व चेंबरच्या गुणवत्तेची पाहणी करताना आयुक्त जिवने.
........
भूमिगत गटारी कामाची आयुक्तांनी तपासली गुणवत्ता
पिंप्राळा हुडको, आशाबाबानगरात पाहणी; तांत्रिक निकषांनुसारच काम करण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : अमृत योजनेंतर्गत भूमिगत गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील वाढीव भागात सुरू असलेल्या कामांना गती मिळाली आहे. तीन झोनमध्ये सुरू असलेल्या या कामांपैकी आतापर्यंत सुमारे १० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामांची गुणवत्ता आणि मंजूर आराखड्यानुसार अंमलबजावणी होत आहे की नाही, याची महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी केली.
अमृत योजनेंतर्गत भूमिगत गटारींचे दुसऱ्या टप्प्यात ६५० कोटी रुपयांचे काम सुरू आहे. यात पिंप्राळा-खेडी भागात ३८३ कोटी रुपयांतून तर हरिविठ्ठल नगर परिसर २९० कोटी रुपयांतून ही भूमिगत गटारींचे जाळे टाकले जाणार आहे. त्यानुसार हुडको परिसरात भूमिगत गटार योजनेच्या मुख्य वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. आयुक्त जिवने यांनी या ठिकाणी शनिवारी भेट देऊन मंजूर नकाशानुसार वाहिनी टाकण्यात येत आहे की नाही, तिची खोली किती आहे, तसेच मुख्य चेंबरची लेव्हल आराखड्यातील मापदंडानुसार आहे की नाही, याची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष मोजणी करून कामातील मापदंडांची पडताळणीही केली. या पाहणीवेळी शहर अभियंता योगेश बोरोले, अभियंता योगेश वाणी यांच्यासह मक्तेदाराचे कर्मचारी व अभियंते उपस्थित होते.
कामात तडजोड नको
भूमिगत गटार योजनेतील वाहिन्या टाकताना कामाची गुणवत्ता कायम राखणे आवश्यक असल्याने आयुक्तांनी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचीही तपासणी केली. मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून कामाची पद्धत, वाहिनी टाकण्याची प्रक्रिया आणि सुरू असलेल्या कामाची सद्यस्थिती याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. कामात कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये, तसेच मंजूर आराखडा आणि तांत्रिक निकषांनुसारच काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पाइप, चेंबरही तपासले
आशाबाबानगर परिसरातही भूमिगत गटार वाहिन्यांचे काम सुरू आहे. या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या डीब्ल्यूसी पाइपची गुणवत्ता, घरांना जोडण्यात येणारे चेंबर आणि वाहिनी जोडणीच्या कामाची आयुक्तांनी पाहणी केली. प्रत्यक्ष काम करताना तांत्रिक बाबींची काटेकोर अंमलबजावणी होत आहे का, याचीही त्यांनी माहिती घेतली.
चौकट
सुरक्षेचीही काळजी घ्या
दरम्यान, भूमिगत गटार वाहिनीचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी चेंबरवरील झाकणे व्यवस्थित बसविण्यात यावीत, जेणेकरून नागरिकांसाठी दुर्घटनेचा धोका निर्माण होणार नाही, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. ज्या ठिकाणी अद्याप खोदकाम सुरू आहे, तेथे सुरक्षा बॅरिकेड्स लावूनच काम करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी मक्तेदाराच्या अभियंत्यांना दिले.