मेन
फोटो : H28836,H28837, H28840
नाशिक : पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिखलामुळे रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत. प्रशासनाने तातडीने चिखल हटवून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (छायाचित्रे : विकी कदम)
---
नाशिककरांचा प्रवास ठरतोय रक्तबंबाळ
पावसामुळे रस्ते झाले चिखलमय; जिवावर उदार होऊन प्रवास
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली संपूर्ण शहर खोदून महापालिका प्रशासनाने नाशिककरांचे जगणे अक्षरशः मुश्कील करून सोडले आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी सततच्या रिमझिम सरीने शहरात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्तेकामांचा चिखल संपूर्ण रस्त्यांवर पसरल्याने प्रमुख मार्ग म्हणजे वाहतुकीचे रस्ते न राहता थेट मृत्यूचे सापळे बनले आहेत. जागोजागी पडलेले जीवघेणे खड्डे आणि चिखलाची घसरगुंडी यामुळे रोज निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत, मात्र महापालिका प्रशासन आणि अधिकारी मात्र याकडे सोईस्कर डोळेझाक करीत आहे.
शहरातील प्रत्येक रस्त्यावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. चिखलावरून दुचाकी घसरून किंवा खड्ड्यात आदळून चालक खाली कोसळतात आणि त्याच क्षणी पाठीमागून येणाऱ्या भरधाव अवजड वाहनांच्या चाकांखाली चिरडले जात आहेत. रोज निष्पाप नाशिककरांचे रक्ताने रस्ते माखत असतानाही पालिका प्रशासनाला याचे सोयरसुतक उरलेले नाही. सातपूरला मंगळवारी (ता. २) सकाळी झालेल्या अपघातात एका २६ वर्षीय विवाहिता प्रतिक्षा आवारी या बळी गेल्या आहेत. रस्त्यावरील चिखलात त्यांची दुचाकी घसरल्याने त्या महाविद्यालयीन बसच्या चाकाखाली सापडून ठार झाल्या तर, त्यांचे पती गंभीर जखमी आहेत. तर आदल्याच दिवशी एका युवकाचा सातपूर एमआयडीसीत रस्ता अपघातात बळी गेला. महापालिकेच्या या बेजबाबदार कारभारामुळे दुचाकीस्वारांचा जीव रोज टांगणीला लागला आहे. सिंहस्थाच्या नावाखाली शहरातील रस्ते खोदून ठेवल्याने जीवघेणे अपघात होत आहेत. विशेषतः दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दुचाकी रस्त्यावर चालवावी की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून महापालिका प्रशासनाला विचारला जात आहे. रस्त्यावरील चिखल हटवण्यासाठी किंवा तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठीही महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. प्रशासनाचा हा नाकर्तेपणा आणि निगरगठ्ठपणा आता नाशिककरांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे.
---
हे करता येऊ शकते
*ज्या ठिकाणी चिखलामुळे रस्ते निसरडे होऊन विशेषतः दुचाकींची घसरगुंडी होते, अशा ठिकाणी महापालिकेने अग्निशमन विभागाच्या वाहनांकडून पाणी मारून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करता येऊ शकतो.
* खोदकामाच्या ठिकाणी रस्त्यावर येणारी माती तात्काळ हटविली जाऊ शकते.
* धोक्याच्या ठिकाणी वाहने सावकाश चालविण्याबाबत फलक लावावेत
* रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावीत
----
हे रस्ते मृत्यूचे सापळे
*त्र्यंबक रोड, गंगापूर रोड : सिंहस्थाची कामे सुरू असलेल्या एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक.
अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल येऊन रस्ते झाले निसरडे.
* जुना आग्रा रोड, टिळक रोड : अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यांची कामे अजून सुरू आहे. खोदकामामुळे माती रस्त्यावर येऊन दुचाकीचालकांसाठी जीवघेणी कसरत
* महामार्ग उड्डाणपुलाखालील रस्ता व सर्व्हिस रोड : उड्डाणपुलावरील चिखल व ऑइलमिश्रित पाणी खालच्या रस्त्यावर पडते. त्यावरून दुचाकींची घसरगुंडी होऊन अपघात
- महात्मानगर रोड, अंबड- लिंक रोड, गरवारे पॉइंट ते एक्स्लो पॉइंट रस्ता : या रस्त्यांचे खोदकाम करून काँक्रिटीकरण सुरू. पण खोदकामामुळे माती रस्त्यावर येऊन चिखल; एक्स्लो पॉइंट, पपया नर्सरी सिग्नल, दत्तमंदिर चौक हे धोकादायक बनले. जागोजागी खड्डे, अवजड वाहनांमुळे लहान वाहनचालकांची जीवघेणी कसरत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.