NSK26H28893
भुसावळ : कोळसा चोरप्रकरणी जप्त कोळसा व ट्रॅक्टरसह अटकेतील संशयित आणि पोलिसांचे पथक.
-------------
दीपनगर औष्णिक केंद्रातून
कोळसा चोरीचा पर्दाफाश
-------
आठ संशयितांना अटक; ट्रॅक्टरसह पाच टन कोळसा जप्त
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. ५ : येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील रेल्वे ऑर्डर जिनिंगमधून कोळसा चोरीचा प्रकार भुसावळ तालुका पोलिसांनी उघडकीस आणला. सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आठ संशयितांना अटक करीत चोरीसाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर व सुमारे पाच टन कोळसा असा एकूण दोन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील रेल्वे ऑर्डर जिनिंगजवळ मंगळवारी (ता.१) कोळसा चोरी होत असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळाली. घटनास्थळी पाहणी केली असता, काही जण ट्रॅक्टरमध्ये कोळसा भरताना आढळून आले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना हटकले असता, संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी आठ संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर संशतियांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला एमपी-१९ सीडी ४७९३ या क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केला. शिवाय चोरीस गेलेला कोळसाही हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत चिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारवाले यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी अधिकारी प्रशांत देडेकर यांच्यासह भुसावळ तालुका पोलिसांच्या पथकाने केली.