रविवार विशेष : जिल्हा परिषदेतून
---
शिक्षणातून परिवर्तनाचा मार्ग
---
किरण कवडे
---
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन व विसापूर आश्रमशाळेतील विद्यार्थिनी मृत्यु प्रकरणाने अवघा नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. या प्रश्नांवरून शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर साशंकता निर्माण केली जात असतानाच शिक्षकदिनी नाशिकच्या दोघा शिक्षकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान झाला. समाजातील या दोन भिन्न घटना असल्या तरी समाज परिवर्तनासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
आदिवासी तालुक्यांतील कुपोषण, आश्रमशाळांचा खालावलेला दर्जा तसेच शिक्षण क्षेत्रातील त्रुटींवरून सध्या नाशिक जिल्हा गाजतो आहे. या घटनांनी नाशिकच्या नावारूपास धक्का पोहचत असताना शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला विसापूर आश्रमशाळेतील विद्यार्थीनीच्या मृत्युप्रकरणाने सर्वत्र खळबळ उडविली. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत असून नाशिक आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सरकार बॅकफुटवर गेल्याची चर्चा आहे. एकीकडे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषद प्रशासन गेल्या काही महिन्यांमध्ये कुपोषणमुक्ती व दर्जेदार शिक्षणासाठी कष्ट घेताना दिसून येत आहे. जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा व शिक्षण विभागाने कुपोषण मुक्तीसाठी ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्याचवेळी आदिवासी तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांमधून कुपोषणमुक्त जिल्ह्यासाठी निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमातून विद्यार्थी पर्यायाने समाजाला शिक्षित करण्याचे कार्य जिल्हा परिषद प्रशासन करीत आहे. या प्रयत्नांचे यश म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे सहकार्य मोलाचे ठरत आहे. अर्थात या प्रयत्नानंतरही जिल्हा संपूर्णतः कुपोषणमुुक्त झालेला नाही. मात्र, कुपोषणमुक्तीच्या दिशेने पडलेले हे सकारात्मक पाऊल म्हणावे लागले.
समाजाला योग्य दिशा देण्याचे बळ हे शिक्षण व्यवस्थेत आहे. समाजातील लाखो शिक्षक हेच व्रत अंगीकारून समाजाला शिक्षित करण्याचे कार्य करीत आहेत. मात्र, व्यवस्थेमधील काही त्रुटी व अपूर्णतेमुळे या कार्याला खीळ बसत आहे. परिणामी विसापूरसारख्या दुर्दैवी घटना घडत असून विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागते. पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता राज्यातील जिल्हा परिषद तसेच शासकीय शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे राज्यातील काही जिल्ह्यांत बदल दिसायला सुरवात झाली आहे. या समाजाच्या बदलात नाशिक जिल्हा परिषदेने यापूर्वीच काही बदल स्वीकारण्यास सुरवात केली आहे. कुपोषणमुक्तीसाठीची चळवळ हा त्याचाच भाग म्हणावा लागेल. अर्थात जिल्हा परिषदेने विद्यार्थी व पर्यायाने समाजाला शिक्षित करण्यासाठी घेतलेला पुढाकार निश्चितच स्तुत्य ठरत आहे. त्यामुळे समाजात योग्य परिवर्तन घडविताना कुपोषण मुक्तीसारख्या प्रयत्नांना यश लाभत आहे. मात्र, जिल्हा परिषदेने थोड्याफार यशावर अवलंबून न राहता समाज परिवर्तनासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. तरच खऱ्याअर्थाने परिवर्तनशील समाज उभा राहण्यास मदत होईल.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.