ॲंकर
-----
लोगो : निमित्त/सचिन जोशी
----
शीर्षक
तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना..!
------
इंट्रो..
‘भाजपवाले पक्ष फोडतात.. नेते फोडतात..’ हे वक्तव्य संजय राऊत यांचं नाहीये.. तर दस्तरखुद्द पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावात शनिवारी हे विधान करीत खळबळ उडवून दिलीय.. २०२१मध्ये उद्धव ठाकरेंपासून एकनाथ शिंदेंनी फारकत घेतल्यानंतर राऊत सातत्याने या घटनेस ‘गद्दारी’ म्हणत असले तरी गुलाबरावांनी प्रत्येक वेळी त्याचा उल्लेख ‘बंड’ म्हणूनच केलांय.. मग, पाच वर्षांनंतर गुलाबरावांना ‘भाजपवाले पक्ष फोडतात..’ याची उपरती कशी आली? हा प्रश्न आहे. अर्थात, याचे लगेचच काही तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता नाही. मात्र, सध्यातरी भाजप-शिवसेनेचं मुंबईपासून गावगल्लीपर्यंत ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना..’ असं झालंय, हे वेगळे सांगायला नको.
----
युती-आघाडीच्या राजकारणात सर्वाधिक काळ टिकलेली युती म्हणून भाजप-शिवसेना युतीकडे पाहिले जायचे. या युतीचा मुख्य आधार हिंदुत्व होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी बांधलेली ती मोट होती. तीन दशकांपासून २०१४पर्यंत कायम असलेल्या युतीत अनेकदा विविध मुद्द्यांवरून, निवडणुकांच्या प्रसंगी जागावाटपावरून मतभेद झालेत. पण, युती अभेद्य राहिली. शेवटी २०१४मध्ये मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपला ‘स्वबळा’वर सरकार येऊ शकेल, अशी खात्री पटल्यानंतर भाजपच्या पुढाकारातून युती तोडण्याची घोषणा झाली.
अर्थात, देवेंद्र फडणवीस ‘१.०’च्या सरकारमध्ये काही दिवसांतच भाजपने शिवसेनेला सोबत घेतले. नंतरच्या साडेचार वर्षांत भाजप-सेनेत एकही दिवस वादाशिवाय गेला नाही. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामा घेऊनच फिरायचे. फडणवीस सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत राजीनामा मात्र, कुणी दिला नाही, ही बाब अलहिदा. पण, या दोन्ही पक्षांत याच कार्यकाळात मोठी दरी निर्माण झाली, हे नाकारून चालणार नाही.
नंतरच्या कालखंडात २०१९ची लोकसभा व पाठोपाठ विधानसभा निवडणूक भाजप- शिवसेनेने युती म्हणून लढवली. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा पवित्रा बदलला व त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेची चूल मांडत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीही झाले. शिवसेनेला पक्ष म्हणून बंड नवीन नव्हते. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरेंच्या मालिकेत एकनाथ शिंदे जाऊन बसले व २०२१ला सेनेतील ५४ पैकी ४० आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. शिंदेंच्या या बंडावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने नेहमीच ‘गद्दारी’ची टीका केली. ही टीका करण्यात खासदार राऊत अग्रभागी होते व आजही ते यासंदर्भातील एकही संधी सोडत नाहीत. ठाकरे, राऊत किंवा त्यांच्या पक्षातील नेत्याने ज्या-ज्या वेळी गद्दारीचा उल्लेख केला, त्या प्रत्येकवेळी शिंदेंचे शिलेदार, गुलाबराव पाटील त्यास ‘बंड’ म्हणून त्याचे समर्थन करीत राहिले. नंतरच्या काळात राष्ट्रवादीतही फूट पडून अजित पवारांचा गट भाजपसोबत सत्तेत आला.
कालपर्यंत बंडाच्या नावाने शिंदेंच्या कृतीचे समर्थन करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांनी शनिवारी शिक्षकदिनी ‘भाजपवाले पक्ष फोडतात.’ असे वक्तव्य करून एकप्रकारे शिंदेची कृती पक्ष फोडणारीच असल्याचे मान्य केलेय. त्यातही गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपचे नेते, मंत्री दुजाभाव करीत असल्याची तक्रार केली. त्यामुळे भाजपच्या गेल्या काही वर्षांतील एकूणच धोरणाच्या विरोधात आता मित्रपक्षातूनच नाराजी व्यक्त होऊ लागलीय. गुलाबरावांचे भाजपबद्दलचे वक्तव्य भाषणापुरते नक्कीच मर्यादित नाही. लगेच नसले तरी त्याचे पडसाद येणाऱ्या काळात उमटतीलच. पण, सध्यातरी सत्तेसाठी ‘तुझं माझं जमेना.. अन् तुझ्यावाचून करमेना..’ हे दोन्ही पक्षांचं धोरण कायम राहील.
-----
(चौकट)
..तर भाजप-शिवसेनाच आमने-सामने
राज्यात व जळगाव जिल्ह्यातही भाजप-शिवसेनेत पक्ष, नेते फोडाफोडीची जणू स्पर्धाच लागलीय. विशेषत: भाजपत तर सद्य:स्थितीत ७०-८० टक्के लोकं ‘उपरे’च आहेत. फोडाफोडीच्या राजकारणात सत्तेतील हे दोन्ही पक्ष मागे नाहीत. विरोधक म्हणून ‘स्पेस’ शिल्लक ठेवायची नाही, या प्रयत्नात भविष्यात जास्त दूर नाही पण.. अगदी २०२९च्या निवडणुकीपर्यंत भाजप-शिवसेना हेच एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी बनून उभे ठाकतील, अशी या दोन्ही पक्षांची सध्याची वाटचाल सांगतेय.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.